मराठीतील एक अभ्यासू, वेगळं काम शोधणारी, मोजकं पण नेटक्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हिचं नाव घेतलं जातं. गेल्या काही वर्षात अमृता हिंदी सिनेमातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. आई ज्योती सुभाष यांच्याकडून आलेला रंगभूमीचा वारसाही अमृताने अगदी समर्थपणे पेलला आहे. अवघाचि संसार या मालिकेतील सोशिक सून असो किंवा वळू सिनेमातील धाडसी नायिका, अमृताने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. ती फुलराणी या नाटकातील मंजू तर अफलातून. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनुभव ऐकण्याची संधी बस बाई बस या शोमधून प्रेक्षकांना मिळाली. या शोमध्ये अमृताने काही भन्नाट अनुभवही शेअर केले.
झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी बस बाई बस हा शो सुरू झाला आहे. अभिनेता सुबोध भावे या शोचा निर्माता आणि निवेदक आहे. नुकतीच या शोमध्ये अमृता सुभाष हिने हजेरी लावली. या निमित्ताने अमृताने तिच्या अभिनय कारकीर्दीतील गाजलेल्या वळू या सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या. या सिनेमातील काही दृश्यांमध्ये अमृताला म्हशींसोबत काही सीन द्यायचे होते. त्यावेळी एखाद्या कलाकाराला ती भूमिका साकारण्यासाठी काय काय करावं लागतं हे ही प्रेक्षकांना कळालं. वळू हा सिनेमा खूपच गाजला होता. अतुल कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी या सिनेमात साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एका गावात वळू पकडण्यासाठी कशी भंबेरी उडते याचे मनोरंजन आणि त्याबरोबरच सरकारी यंत्रणेचा कारभार दाखवणारा हा सिनेमा.
उमेश कुलकर्णी याने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात अमृतावर एक सीन शूट होणार होता ज्यामध्ये ती म्हशीवर बसून जातात दाखवायचे होते. तो अनुभव सांगताना अमृता म्हणाली, म्हशीवर बसून जायचे होते याची मी रिहर्सल केली. पण जेव्हा फायनल शूट होतं तेव्हा माझ्यासमोर दुसरीच म्हैस आणून ठेवली. जिच्यासोबत मी सराव केला होता ती म्हैस वेगळी असल्याने मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली. पण म्हशीच्या मालकाने तो काळजी घेईल. आणि म्हैस प्रेमळ आहे असं सांगितलं. शूट सुरू झालं, पण व्हायचं तेच झालं आणि म्हैस उधळली. म्हशीवर बसून मी समोरच्या तलावात जाते असा सीन होता, पण मी रस्त्यातच पडले.
अमृता म्हणाली, हा सगळा शूटिंगचा थाट पाहण्यासाठी गावातले लोक उभे होते. म्हैस उधळल्यानंतर आणि मी पडल्यानंतर शॉट तर कट झालाच, पण एकच गोंधळ उडाला. त्या गर्दीत एक गावकरी म्हणाला, अहो ताई, म्हशीवरून पाण्यातच पडायचं ना, रस्त्यात कशाला पडलात. आता त्याला काय सांगणार? अमृताने हा किस्सा सांगताच छोट्या पडद्यावरची ती सेलिब्रेटी बसही डोलायला लागली. या शोमध्ये अमृताने अवघाचि संसार महिलेचे शीर्षक गीत, मन माझे मोरपिशी स्वप्न जणू गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.