शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे राज्यभर दौरे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कराड येथे महानाट्याचे प्रयोग पार पडल्यानंतर अमोल कोल्हे आणि नाटकाची संपुर्ण टीम पिंपरी चिंचवड परिसरात दाखल झाली आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी चिमुरड्या प्रेक्षकांनी देखील गर्दी केलेली आहे. अनेक लहान मुलं छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज बनून या प्रयोगाला उपस्थिती लावत आहेत. मात्र आता या नाटकाचे प्रयोग होत असताना डॉ अमोल कोल्हे यांनी फ्री पास मागणाऱ्या पोलिसांचा चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. काल पिंपरी चिंचवड येथे महानाट्याचा प्रयोग झाला त्यावेळी अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे मी पूर्णपणे भारावून गेलो आहे अशी प्रतिक्रिया ते देतात. पण काही पोलीस फ्री पासेसची मागणी करताना दिसली. त्यांनी या प्रेक्षकांचा आदर समोर ठेवून तसे कृत्य करावे असा खरपूस शब्दात समाचार घेतला होता. या तिकीट विक्रीतून जे काही पैसे जमा होतात त्यातूनच कलाकारांचा, बॅक आर्टिस्टचा पगार देण्यात येतो. तेव्हा पोलिसांनी फ्री पास मागू नयेत अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली होती. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर मात्र आता पोलिसांकडून त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. फ्री पास दिला नाही म्हणून पोलिसांनी ‘नाटक कसं होतं ते पाहतोच’ अशी मुजोर शब्दात धमकी दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. यावर आता अमोल कोल्हे यांनी कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. दरम्यान एप्रिल महिन्याच्या अखेरीस कराड येथे प्रयोग पार पडले. त्यावेळी अमोल कोल्हे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली होती. स्वार झालेल्या घोड्याचा पाय अडखळल्यामुळे अमोल कोल्हे यांच्या मणक्याला लचक बसली होती. त्यांना नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे पुढील दोन दिवसांचे प्रयोग रद्द करून १ मे रोजी प्रेक्षकांना आमंत्रित केले. ज्या प्रेक्षकांना येणे शक्य नव्हते त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याचे आश्वासन देखील दिले होते. दुखपतीतून बरे झाल्यानंतर प्रयोग होतील असे जाहीर केले. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड येथील एच ए मैदानावर महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यात पोलिसांच्या फ्री पास देण्याच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांनी जाहीर नाराजी दर्शविलेली पाहायला मिळाली.