मराठी चित्रपटातून सोज्वळ, सोशिक नायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांनी नुकतीच पुण्याच्या येरवडा कारागृहाला भेट दिली. केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता अलका कुबल नेहमी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांशी सुसंवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत असतात. यावेळी त्यांची धाकटी लेक डॉ कस्तुरी आठल्ये ही देखील त्याठिकाणी उपस्थित होती. येरवडा येथील महिला कारागृहात अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. याच निमित्ताने काल गुरुवारी भोई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कारागृहातील बंदिवान महिलांकरिता सुसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भोई प्रतिष्ठान अंतर्गत आजवर अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. येरवड्यातील कारागृहात असाच एक उपक्रम त्यांनी राबवलेला पाहायला मिळाला. त्यानिमित्ताने अलका कुबल यांनी प्रमुख उपस्थिती लावली. अलका कुबल यांनी बंदिस्त महिलांशी सुसंवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. महिलांनी खचून न जाता जिद्दीने आलेल्या संकटांना तोंड द्यावे आणि नव्याने आयुष्य जगावे असे मार्गदर्शन त्यांनी केले होते. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बंदिस्त महिलांना मानसिक आधार देण्याचे काम या संकल्पनेतून मांडले. त्याला अलका कुबल यांनीही मोठे सहकार्य केले. या कार्यक्रमात अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी देखील हजर राहिली होती. कस्तुरी आठल्ये हिने नुकतीच डॉक्टरची पदवी मिळवली आहे.
कस्तुरीने देखील या कार्यक्रमात हजेरी लावल्याने उपस्थित महिला कैद्यांशी तिने सुसंवाद साधलेला पाहायला मिळाला. आपल्या दोन्ही लेकी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा अल्का कुबल यांना सार्थ अभिमान आहे. जिद्द आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने दोघींनी आपापल्या क्षेत्रात यश संपादन केलेलं आहे. कस्तुरी आणि इशानी या शिक्षणासाठी परदेशात होत्या. प्रोफेशनल पायलट बनल्यावर इशानी भारतात परत आली होती. गेल्या वर्षी इशानीने निशांत वालिया सोबत लग्नगाठ बांधली. इशानीच्या लग्नात कस्तुरीने सुद्धा आवर्जून हजेरी लावली. तेव्हा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. डॉक्टर बनून कस्तुरीने भारतात आल्यानंतर येथील रुग्णांची सेवा करावी अशा प्रतिक्रिया अलका कुबल यांना मिळाल्या होत्या.