डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे म्हणायला हरकत नाही. कारण हार्दीकच्या आईला अक्षया पसंत होती आणि त्यांनीच तिला लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. हा किस्सा नेमका काय होता हे जाणून घेऊयात.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका कोल्हापूरमध्ये शूट होत होती. मालिकेतील राणा आणि अंजलीचे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडले होते. आपल्यालाही अशीच सून हवी असा हार्दिकच्या आईने विचार केला. मालिका सुरू होऊन वर्ष लोटले होते तेव्हा २०१७ साली हार्दिकच्या आईने त्याला फोन केला, तो फोन अक्षयाने रिसिव्ह केला. हार्दिक शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे तिने त्यांना सांगितले. त्याचवेळी त्यांनी तू माझ्या मुलाशी लग्न करशील का? असा प्रश्न विचारला. अक्षयाने त्यावेळी नाही, आमच्यात असं काहीच नाहीये असे स्पष्ट उत्तर दिले. कारण त्यावेळी पाठकबाईचे पात्र लोकांना विशेष आवडले होते. अनेजण तिला आपल्याला अशीच सून हवी म्हणून सांगत होते. त्यामुळे हार्दीकच्या आईचे बोलणे तिने फारसे मनावर घेतले नव्हते.
खरं तर ही गोष्ट हार्दीकला मुळीच माहीत नव्हती. पण जेव्हा आपली आई अक्षयाला अशी बोलली हे त्याला कळलं तेव्हा त्याने आईला बरंच काही ऐकवलं. असं कसं तू तिला विचारलं? आमची खूप छान मैत्री आहे. याने आमचं बोलणं पण बंद होईल, तिने जर कम्प्लेन्ट केली तर काय होईल? असे म्हणून त्याने आईला गप्प केलं होतं. त्यानंतर पुढील काही वर्ष दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते. हा विषय २०२० मध्ये पुन्हा निघाला. त्यादरम्यान हार्दिक तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतून काम करत होता. तेव्हा मालिकेचे शूटिंग नाशिकला होत होते. एकदा माझ्यासाठी विचार असा हट्ट हार्दीकच्या आईने त्याच्याजवळ पुन्हा केला, तेव्हा हार्दिक अक्षया देवधरशी बोलणी करायला तयार झाला.
अक्षयाने हार्दीकला ही गोष्ट तिच्या आई वडिलांजवळ सांगायला लावली. त्यानंतर अक्षयाच्या आईनेच त्यांच्या लग्नाच्या तारखा मेसेज करून हार्दीकला पाठवल्या. तेव्हा साधारण एक महिन्यातच साखरपुड्याची तारीख ठरवण्यात आली. त्यानंतर अतिशय गुप्तता बाळगून दोघांनी साखरपुड्याचे फोटोच शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.