आपल्या हक्काचं घर खरेदी करणं ही गोष्ट प्रत्येकासाठीच खूप महत्वाची मानली जाते. छोट्या छोट्या गावातून ही कलाकार मंडळी मुंबईची वाट धरतात. इथे येऊन स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात, मग स्वप्न सत्यात उतरावीत म्हणून आपर मेहनतही घेतात. अशीच मेहनत घेऊन अल्पावधीतच एका कलाकाराने दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ड्रीम्स कम ट्रू म्हणत अभिनेता अक्षय टाक याने त्याचं घर घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत अक्षयने तात्याची भूमिका गाजवली होती. तात्याच्या भूमिकेसाठीच तो जास्त ओळखला जातो.
सध्या तो कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेतून तशाच स्वरूपाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षय हा मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचा. पैठणच्या जिल्हा परिषद शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले, पुढील शिक्षणासाठी तो शहरात गेला. कॉलेज झाल्यानंतर हाताला काम मिळावे म्हणून तो आपला आवडता छंद जोपासू लागला. अक्षयला विनोदनिर्मिती करण्याची भयंकर आवड होती. यातूनच तो इव्हेंट आयोजकांकडे कॉमेडी आर्टिस्ट म्हणून काम करू लागला. पुढे मुंबईत आल्यानंतर त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. छोट्या छोट्या भूमिकेतून अक्षय या इंडस्ट्रीत जम बसवू पाहत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील तात्याच्या भूमिकेने. अल्पावधीतच अक्षय प्रसिद्धीच्या झोतात आला.
मुसंडी, महाराष्ट्र शाहीर, संत गजानन शेगावीचे, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, सिंधुताई माझी माई अशा विविध मालिका तसेच चित्रपटातून अक्षय टाकने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला. या प्रवासात स्वतःच्या हक्काचं घर असावं हे स्वप्न त्याने पाहिलं आणि आज त्याचं हे स्वप्न सत्यात देखील उतरलं. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत काम करत असतानाच अक्षयचे निकिता बुरांडे सोबत लग्न झाले होते. निकिता बुरांडे ही देखील अभिनेत्री आहे. संत गजानन शेगावीचे मालिकेत तिने राधाची भूमिका साकारली होती. काल अक्षय आणि निकिता टाक यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. गेल्याच महिन्यात त्यांना घराचा ताबा मिळाला होता. मिस्टर अँड मिसेस टाक अशी नावाची पाटी त्यांनी घराबाहेर सजवली आहे. या गोड बातमीने सेलिब्रिटींनी अक्षय आणि निकीताचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.