चित्रपट मालिकांमधून आक्षेपार्ह विधानं केली जातात. ज्यातून लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर लगेचच त्याला विरोध केला जातो. चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला कायमच बंधनं लादलेली पाहायला मिळतात. विनोद निर्मिती करताना चुकून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या तर कलाकारांना वेळीच समज देण्यात येते. प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम असो किंवा समीर चौघुले यांनी अनावधानाने आपल्या सादरीकरणातून अनेकदा भावना दुखावल्या गेल्याने माफी मागितली आहे. अशातच आता आगरी कोळी समाजाने कलासृष्टीलाच याबाबतीत थेट इशाराच दिलेला पाहायला मिळतो आहे.
आगरी कोळी भाषा विनोदी स्कीट्समध्ये सर्रास वावरली जाते. या भाषेची एक विशिष्ट अशी मज्जा आहे आणि त्याला संपूर्ण राज्यातून पसंती दिली जाते. मात्र चित्रपट मालिकांमधून आगरी कोळी माणसाला दरवेळी बेवडा आणि अडाणी दाखवण्यात येतं. इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशारा आगरी कोळी बांधवांनी कला सृष्टीला दिला आहे. हिंदी चित्रपटात कामवाली बाई म्हणून मराठी स्रियांना दाखवलं जातं. त्यावेळी मराठी माणसांच्या भावना दुखावतात. त्यामुळे अशा चित्रपटांना विरोध दर्शवला जातो. मग आगरी कोळी बांधवांनाही कायम बेवडा किंवा अडाणी दाखवलं जातं. यामुळे आमच्या आगरी कोळी बांधवांच्या भावना दुखावतात असे या समाजाने म्हटले आहे. आज आगरी कोळी बांधव त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय तसेच राजकिय स्तरावर स्वतःचे नाव लौकिक करत आहेत.
तरीही नेहमी नाटक, मालिका, चित्रपटातून काही सुशिक्षित लोकं नेहमी आगरी कोळी लोकांना त्यांच्याच चष्म्यातून बघतात. बाकीचे काय मिनरल वॉटर पितात का? या वृत्तीचा जाहीर निषेध करत कलाकार सर्वेश तरे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वेश हे म्युझिशियन आहेत, त्यांनी काही आगरी कोळी भाषेत गाणी तयार केली आहेत. पहिल्यांदाच आगरी कोळी भाषेत भुता हाव आमी हे आगळंवेगळं रॅप सॉंग तयार करून लोकांची वाहवा मिळवली होती. चल नारली पुनवचे सणाला, मोगऱ्या सारखं गाल, बावरी माझे मनाची, भुता हाव आमी रातीला आमी भीत नाय अशी गाणी त्यांनी बनवली आहेत. आपल्या आगरी कोळी समाजासाठी ते कायम झटत असतात. त्यांच्यासाठी आवाज उठवत असतात. वेळप्रसंगी चांगल्या कामचं कौतुकही करतात.