द केरला स्टोरी चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्माला मोठी प्रसिद्धी मिळाली. २००८ सालच्या १९२० या विक्रम भट्ट यांच्या बॉलिवूड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. द केरला स्टोरी मुळे अदा शर्मा चांगलीच चर्चेत राहिली. मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या अदाला मराठी कविता आजही तोंडपाठ आहेत. सोशल मीडियावर आणि विविध मुलाखतीत चालीत म्हटलेल्या या कविता महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसली आहे. अदा शर्माचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले, त्यामुळे मराठी भाषा तिला चांगलीच अवगत आहे.
अटक मटक चवळी चटक, एक होती इडली सारखी बडबडगीतं तिची तोंडपाठ आहेत. कमालीच्या प्रसिद्धी झोतात असल्याने आता अदा शर्माला महाराष्ट्र सरकारने ब्रँड अँबेसिडर बनवलं आहे. मुंबई येथे मंत्रालयात स्वसंरक्षण शिकावे यासाठी आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ३.५ लाख मराठी मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण धडे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण उपक्रमाची ब्रँड अँबेसिडर म्हणून अदा शर्माची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल अदाने शासनाचे आभार मानले आहेत. जाहिरात क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध चेहरा म्हणून अदाने गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नामांकित कंपन्यांसाठी काम केले. तिने गोदरेज, जॉय आणि निव्हियासह अनेक कॉस्मेटिक आणि स्किन केअर म्हणून नावाजलेल्या ब्रॅण्डसाठी अगोदरच अँबेसिडर म्हणून ओळखली जाते.
अनेक फॅशन कंपन्यां जसे की Olay, Titan आणि Pantaloons यांचे तिने प्रमोशन देखील केले आहे. अदा शर्माने आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देताना ‘तुझ्या विना वैकुंठाचा’ हे गाणं म्हटलं होतं. त्यावर मराठी सेलिब्रिटींनी तिच्या याही टॅलेंटचं मोठं कौतुक केलं. मल्टी टॅलेंटेड अभिनेत्री अदा शर्मा अमराठी असूनही तिला मराठी भाषेविषयी खूप आपुलकी आहे. मराठी गाणी, बडबड गीत असो वा शिव तांडव स्तोत्र किंवा माय मराठीतून संवाद साधणं असो. अदाने तिच्या दिलखुलास अदा दाखवून मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात द केरेला स्टोरीच्या टीमला तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. अदा सोबत मीडियाशी संवाद साधताना टीमने पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.