तुमच्या दिसण्यावर तुमची भूमिका ठरते याची प्रचिती आजवर अनेक कलाकारांनी घेतली आहे. तुम्ही हिरोईन मटेरिअल आहेत की नाही हे त्या चित्रपटाचे सर्वेसर्वा ठरवत असतात. म्हणजेच तुम्ही जर सुंदर दिसत असाल तरच तुम्ही नायिका म्हणून चालू शकता. किंवा तुम्ही हँडसम असाल तरच तुमची नायकासाठी निवड केली जाते. हीच खंत अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने बोलून दाखवली आहे. ऋतुजा बागवे सध्या प्रकाशझोतात आली आहे कारण लंडन मिसळ, सोंग्या असे तिचे एकामागोमाग दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
चित्रपटाच्या लॉन्च दरम्यान ऋतुजाने तिच्या मनातली ही खंत बोलून दाखवली आहे. २०१७ साली ऋतुजाची प्रमुख भूमिका असलेलं अनन्या हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकातील नायिकेला हात नसल्याने तिचा संघर्ष दाखवण्यात आला होता. हेच नाटक पुढे चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हा चित्रपटाची नायिका म्हणून ऋतुजाला डावलण्यात आलं. अनन्या या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकली होती. आपण सुंदर दिसत नाहीत म्हणून मला ही भूमिका नाकारली होती असे ऋतुजा हा खुलासा करताना म्हणते. माझ्याच नाटकाचा चित्रपट होत होता तेव्हा मी सुंदर दिसत नाही म्हणून मला त्यांनी नाकारलं होतं. या गोष्टी माझ्या वाट्याला खूपदा आल्या आहेत.
दैनंदिन मालिकेत जेव्हा मी नांदा सौख्य भरे ही मालिका केली त्याअगोदर मला नाकारण्यातच येत होतं. का तर मी हिरोईन मटेरियल दिसत नाही. मला तेव्हापासूनच असा प्रश्न पडायचा की, का? नॉर्मल मुलींच्या आयुष्यात कधीच काही त्रास होऊ शकत नाही? हिरोईन सुंदर दिसणं का गरजेचं आहे? मला असं वाटतं की ते कॅरॅक्टर सुंदर दिसणं महत्वाचं आहे. काही अशी पात्र असतील ज्यात माझं दिसणं योग्य असेल. मी देवाचे आभार मानेल की, माझ्या आयुष्यात अशी एक फेज आली जिथे आपल्यासारख्या दिसणाऱ्या, घरातल्या वाटणाऱ्या साध्या मुलींना ही संधी मिळू लागली. आणि लोकांनाही ते आवडू लागलं तेव्हा मला नायिकेची भूमिका मिळू लागली. माझं काम मला सिद्ध करायचं होतं ते मी अनन्या नाटकातून सिद्ध करून दाखवलं.
अरे पण जर आपण हे करू शकतोय पण पुन्हा चित्रपटात आपण हिरोईन मटेरिअल दिसत नाही, म्हणून आपल्याला नाकारलं गेलं हे कुठेतरी मनात टोचलं. ऋतुजा बागवेच्या या वक्तव्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिच्या दिसण्याचं मोठं कौतुक करण्यास सुरुवात केली. तू खूप छान दिसतेस असे अनेकांनी तिला समाजावत तिच्या यशस्वी प्रवासाचं कौतुक केलं.