पीएसआय असलेल्या पल्लवी जाधव यांनी धडाकेबाज कामगिरी करत लेडी सिंघमची पदवी मिळवली आहे. सोबतच मराठी चित्रपट सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून पाऊल टाकुन आपली आवड देखील जोपासली आहे. लवकरच पल्लवी जाधव या विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नातील मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पल्लवी जाधव यांनी अपार मेहनत आणि अतिशय खडतर प्रवास करत पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टीव्हीमध्ये झळकायचं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं.
मात्र जसजसे कळू लागले की आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, आपण एका शेतकऱ्याची मुलगी आहोत. तसतसे हे स्वप्न स्वप्नच राहणार याची जाणीव पदोपदी होत गेली. पुढे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांच्या वयाच्या असणाऱ्या सर्वच मुलींची लग्न होत गेली. आई वडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला मात्र यातूनही मार्ग काढून आपले शिक्षण थांबायला नको हा निर्णय मनाशी पक्का केला. आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवी यांनी कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा अभ्यास करण्यासाठी आई वडिलांनी बचतगटातून ५ हजारांचे कर्ज काढून दिले. कमवा आणि शिका या योजनेतून २०१५ साली ८० टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली.
याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळवलं. पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करतात. जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला. तर मिस फोटोजेनिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. अधिकारी बनण्याचे स्वप्न तर त्यांचे पूर्ण झालेच. लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात नायिका बनून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून कधी प्रदर्शित होणार हे अजून गुलदस्त्यात आहे. तो प्रदर्शित होईल तेव्हा होईल मात्र त्यागोदरच पल्लवी जाधव यांनी लग्नगाठ बांधण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या कोणासोबत लग्न करणार आहेत हे अजून तरी जाहीर केलेले नाही.