इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य अधिक सोपे बनू लागले आहे. पण याच्या वापराचे दुष्परिणाम देखील अनेकांना सोसावे लागले आहेत. ऑनलाईन फसवणूक ही एक वाढती समस्या बनली आहे. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसल्याने किंवा निष्काळजीपणाने अशा घटनांना अनेकजण बळी पडले आहेत. त्यामुळे त्यांना हजारोंचा गंडाही घातला जात असल्याचे उघड झाले आहे. सामान्य नागरिकांना अशा घटनांना अनेकदा सामोरे जावे लागत असले तरी सेलिब्रिटींनाही असे अनुभव नेहमीच मिळालेले आहेत. आपले अकाउंट वापरून लोकांकडून पैसे मिळवणे अशी शक्कल वापरताना दिसतात.
मात्र आता लाईटबिल थकल्याचे दाखवूनही अनेकांकडून लूट केली जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी मराठमोळ्या अभिनेत्रीची देखील फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे प्रिया शिंदे. होऊ दे जरासा उशीर या चित्रपटातून तिने मराठी सृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं. यानंतर प्रियाने हिंदी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. ये कहा आ गये हम, डोली अरमानों की, हमारी सांस लीला, तुझसे है राबता, नागीन, क्राईम पेट्रोल, सीआयडी, सावधान इंडिया सारख्या हिंदी मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियाची फसवणूक झाली असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे आणि आपल्या चाहत्यानाही सतर्क राहण्याचा तिने सल्ला दिला आहे.
प्रियाला लाईट बिल थकल्याचा एक मेसेज आला होता. मागच्या महिन्याचे लाईटबिल थकले असल्याने तुमच्या घराचे लाईट कनेक्शन आज रात्री ९ वाजता कट केले जाईल. असा मेसेज आल्यावर त्यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास त्यांनी सांगितले होते. प्रियाने त्या नंबरशी संपर्क साधला असता तिला एक अँप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रियाने ती प्रोसेस पूर्ण केली. आणि काही वेळातच तिच्या अकौंटमधून पैसे कट झाल्याचे तिच्या लक्षात आले. प्रियाने त्या दिलेल्या नंबरवर पुन्हा एकदा संपर्क केला. पण समोरून कुठलाच रिप्लाय न आल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. प्रियाने ही बाब सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जेणेकरून अशा फसव्या लोकांकडून कोणीही फसवले जाऊन नयेत. प्रियाने ही माहिती शेअर करताच तिच्या चाहत्यांनी देखील असा मेसेज आम्हालाही आला असल्याचे म्हटले आहे. असे गुन्हे सर्रासपणे चालू आहेत अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. काही हजाराना गंडा घालणाऱ्या या टोळीला गजाआड करण्यासाठी प्रियाने पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी असेही तिला सुचवले आहे.