सहाय्यक भूमिका ते प्रमुख अभिनेत्री असा पूजा सावंतचा अभिनय क्षेत्रातला प्रवास फारच उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे. महाराष्ट्राची श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून सहाय्यक भूमिका साकारली होती. पोश्टर बॉईज, गोंदण, दगडी चाळ, लपाछपी, विजेता, बोनस चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या पूजाला जंगली चित्रपटातून थेट बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. नुकतीच पूजा सावंत हिने एक मुलाखत दिली आहे.
मुलाखतीत पूजाने आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल उलगडा केला आहे. कलाकार नेहमीच ट्रोकिंगला सामोरे जात असतात. पुजालाही हे गणित चुकलेलं नाही. पण निगेटिव्ह कमेंटमुळे मला खूप त्रास होतो असे पूजा या मुलाखतीत म्हणते. निगेटिव्ह कमेंट आली तर मी ती वाचते अन लगेचच डिलीट करते. अशा ट्रोलिंगवर पूजाचे परखड मत आहे की, ट्रोलिंग करणाऱ्याने अगोदर त्याची लायकी बघायला हवी आणि मगच ट्रोलिंग करावं. प्रत्येकामध्येच काहीतरी कमी असते हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. या मुलाखतीत पूजा सावंतने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पूजा घरात मोठी मुलगी असल्याने तिने आजवर सगळ्यांना सांभाळण्याचे काम केलं आहे.
पण मला असा मुलगा हवाय जो मला सांभाळून घेईल आणि मला कधीच दुखावणार नाही. मराठी सृष्टीत चित्रपट मिळण्याबाबत पूजा असेही म्हणते की मला चित्रपट मिळतात पण माझी उंची जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामं नाकारली जातात. कथानक वगैरे सगळं आवडलं असलं तरी नायक कोण असणार यावर माझी निवड ठरते. कारण चित्रपटाचा नायक उंच नसेल तर मला रिजेक्ट केलं जातं. म्हणजे जर माझ्याकडे ५ चित्रपट आले तर त्यातले निवडकच चित्रपट मला करायला मिळतात. आणि मी ज्यांच्यासोबत काम केलं आज ते माझे मित्र झाले आहेत असे पूजा आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबाबत उलगडा करते.