जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. मालिकेत कालींदी हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत आहे. चांदुलेला नेहमी त्रास देणारी कालींदी प्रेक्षकांच्या रोषाला सामोरी जाताना दिसते. हे पात्र साकारले आहे अभिनेत्री ‘पूजा रायबागी’ हिने. पूजा रायबागी ही मराठी नाट्य, चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून तिला विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेत्री पूजा रायबागी ही मुंबईतच लहानाची मोठी झाली. विविध नाट्यस्पर्धांमधून तिने सहभाग दर्शवला होता. अभिनयाचे धडे गिरवत असताना तिला तांडव चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. डॅशिंग पोलीस अधिकारी कीर्ती पाटीलची भूमिका तिने या चित्रपटात निभावली होती. या भूमिकेसाठी पूजाला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले होते. जुन्नर मधील विनायक खोत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना ती तिथेच गावी राहिली होती. पूजाने घेतलेली ही मेहनत चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. यदा कदाचित, खळी, ललित २०५, झुंड, फायरब्रँड, असंही होतं कधी कधी, संगीत मत्स्यगंधा, कानांची घडी तोंडावर बोट या नाटकातून आणि मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मुंगी उडाली आकाशी या कादंबरीचे अभिवाचन तिने एका कार्यक्रमात केलं होतं.
२८ डिसेंबर २०२१ रोजी पूजा रायबागी हिने प्रसाद डबके सोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे खास फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसाद डबके हा देखील अभिनेता आणि कलाकार आहे. त्याला फोटोग्राफीची आणि चित्रकलेची आवड आहे. स्टार प्रवाहवरील नुकत्याच येऊन गेलेल्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेत तो झळकला होता. गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका त्याने या मालिकेत निभावली होती. फक्त मराठीवरील सिंधू या लोकप्रिय मालिकेत देखील त्याने गंगाधर अष्टपुत्रेची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. हे दोघेही कलाकार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पूजा रायबागी आणि प्रसाद डबके यांचे नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्या निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.