कलाकार मंडळी ही नेहमीच अभिनय क्षेत्राच्या जोडीला व्यवसाय क्षेत्रातही आपले नशीब आजमावतात. हिंदी सृष्टीत या गोष्टी सर्रास अनुभवायला मिळतात. अशातच मराठी कलाकारांनी देखील आता हॉटेल व्यवसाय क्षेत्रात जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने देखील अभिनयाच्या जोडीला या व्यवसायात पाऊल टाकलेले आहे. २०२० साली शार्दूल सिंह बयास या व्यावसायिका सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर नेहा वकाई या रेस्टॉरंटची मालकीण झाली. शार्दूलला जापनीज फूड खायला खूप आवडतं याच हेतूने त्यांनी जापनीज फूड मिळणारे रेस्टॉरंट सुरू केले.
आता नुकतेच त्यांनी मुंबईतील एमआयजी कॉलनी, कोळीवाडा, वरळी येथे ‘वरळी नाका’ या नावाने दुसरे रेस्टॉरंट सुरू केले आहे. तिच्या या नवीन व्यवसायानिमित्त सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. नेहा पेंडसे ही हेल्थ कॉन्शियस आहे. भाभीजी घर पर है या मालिकेत काम करत असताना तिला रोजचा १३० किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा. यामुळे तिच्या शरीरावर मोठा परिणाम जाणवू लागला. अन्नपचन व्यवस्थित न झाल्याने तिला इतर व्याधी जडत गेल्या. त्यानंतर मात्र सहा महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट तिने कसेबसे पूर्ण केले आणि मालिकेला रामराम ठोकला. नेहा पेंडसे मधल्या काळात जून चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मराठी सृष्टीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर नेहाने तिची पावलं हिंदीकडे वळवली. हिंदी चित्रपट, रियालिटी शो तसेच मालिकांमधून तिने या क्षेत्रात आपला जम बसवला. हिंदी सृष्टीत थोडीशी स्थिरस्थावर झाल्यानंतर २०२० साली शार्दूल सोबत तिने लग्नगाठ बांधली. नेहा पेंडसे सोबत लग्न करण्याअगोदर शार्दूलचा दोनदा घटस्फोट झाला होता आणि त्याला दोन अपत्ये देखील होती. शार्दूलसोबतच्या या लग्नाच्या बातमीने नेहा आणखीनच प्रकाशझोतात आली. त्यांच्या लग्नाची चर्चा गेले कित्येक दिवस मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. सध्या नेहा पेंडसे आणि शार्दुल दोघेही हॉटेल व्यवसायात लक्ष केंद्रित करत आहेत. अनोखी खासियत असलेल्या या दोन्ही रेस्टॉरंटला खवय्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.