हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचा सुरुवातीचा काळ मराठमोळ्या नायिकांनी गाजवला होता. यात ललिता पवार, लीला चिटणीस, दुर्गा खोटे, शोभना समर्थ, शांता आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. यांच्या जोडीलाच नलिनी जयवंत नावाची देखणी नायिका अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन गेली. १८ फेब्रुवारी १९२६ रोजी नलिनी जयवंत यांचा जन्म गिरगावातील मराठी कुटुंबात झाला. नृत्य आणि गायन याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. काजोलची आज्जी म्हणजेच अभिनेत्री शोभना समर्थ या नलिनी जयवंत यांच्या आत्याची मुलगी. शोभना समर्थ यांची मुलगी नूतनचा जन्म झाला तेव्हा त्या कार्यक्रमात निर्माते चिमनलाल देसाई आले होते.
तिथे त्यांनी नलिनी जयवंतला प्रथम पाहिले. त्यानीच नलिनीला १९४१ सालच्या राधिका या चित्रपटातून प्रमुख भूमिका देऊ केली. १९४५ साली चिमनलाल यांचा मुलगा वीरेंद्र देसाई सोबत नलिनी विवाहबद्ध झाल्या. वीरेंद्र हे नलिनीप्रेक्षा वयाने खूप मोठे होते याअगोदर त्यांचे एक लग्न झालेले होते. त्यामुळे चिमनलाल यांनी आपल्या मुलाला इस्टेटीतून बेदखल केले. एका भाड्याच्या घरात नलिनी आणि वीरेंद्र यांनी संसार थाटला, मात्र अवघ्या तीन वर्षात त्यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर नलिनी यांनी पुन्हा एकदा चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. १९५० सालच्या समाधी या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. राजकन्या, नाज, नास्तिक, जलपरी, सलोनी अशा अनेक चित्रपटातून त्यांना नायिका म्हणून मोठी लोकप्रियता मिळाली.
अमर रहे ये प्यार चित्रपटा दरम्यान नलिनी यांनी प्रभू दयाल यांच्यासोबत दुसरा संसार थाटला आणि अभिनयातून काढता पाय घेतला. १९८३ साली नास्तिक चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आई बनल्या. आपल्या भूमिकेला पुरेसा वाव न मिळाल्याने नाराजीने त्यांनी अभिनयाला कायमचा रामराम ठोकला. २००१ साली प्रभुदयाल यांचे निधन झाल्यावर नलिनी आपल्या बंगल्यात एकाकी जीवन जगू लागल्या. त्यांच्या बंगल्याच्या जवळच भावाचा मुलगा राहत असे. २२ डिसेंबर २०१० साली नलिनी यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा मृत्यू नंतरचे विधी भाच्याने पार पाडले होते. त्यावेळी नलिनी यांचा मृतदेह घरात पडून होता अशी अफवा प्रसार माध्यमातून पसरली होती. आजही असेच काही चित्र त्यांच्या मृत्यूबाबत रेखाटले जाते. मात्र भाच्याने त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली होती हे सत्य फार उशिरा लोकांसमोर आले होते.