खुलता कळी खुलेना या मालिकेमुळे पेशाने डेंटिस्ट असलेली मयुरी देशमुख अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. त्याअगोदर मयुरी चित्रपट आणि नाटकातून आपले नशीब आजमावू पाहत होती. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात मयुरी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी सृष्टीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने आशुतोष भाकरे सोबत लग्नाची गाठ बांधली. मात्र दोन वर्षांपूर्वी आशुतोषचे निधन झाले होते. आशुतोषच्या मृत्यूनंतर मयुरी एकाकी जीवन जगू लागली. यावेळी ती डिप्रेशनमध्ये देखील गेली. स्वतःला सावरत पुन्हा नव्या उमेदीने तिने हिंदी मालिका सृष्टीत पदार्पण केले. इमली मालिकेतून मयुरी हिंदी सृष्टीत चांगली प्रसिद्धी मिळवू लागली.
दरम्यान एक विरंगुळा म्हणून मयुरी परदेशात ट्रिप एन्जॉय करताना दिसली. त्यावेळी अनेकांनी तिच्यावर सडकून टीका केली. नवऱ्याचे निधन होऊन वर्षही झाले नाही तरी मयुरी फिरते, मौजमजा करते अशा टीकेला तिला सामोरे जावे लागले. मात्र जी महिला विधवा आहे तिने तिचं आयुष्य सुखाने घालवू नये का. की त्याच दुखात तिने वाहत राहावं असे म्हणत तिच्या बाजूने नेटकऱ्यांनी बोलण्यास सुरुवात झाली. या टीकाकारांना मयुरीने देखील सडेतोड उत्तर दिले होते. नुकतेच मयुरी अभिज्ञा भावे सोबत फिरायला गेली होती. यावेळीही तिला अशा टीकेचा सामना करावा लागला. हा सारासार विचार करून मयुरीने लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मयुरी म्हणते की, कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःला सावरणाऱ्या स्त्रीपेक्षा काहीही धोकादायक असू शकत नाही.
त्यांनी तिला सोडलेल्या घाणीतून जर ती वर येऊ शकते, तर ती कुठल्याच गोष्टीला घाबरू शकत नाही. ती तुमच्या अनादराशीही जुळवून घेऊ शकते, त्यामुळे सावध रहा. मयुरीची हे म्हणणे अनेकांनी समर्पक असल्याचे म्हटले आहे. टीकाकार टीका करतच राहतात, त्यातून स्वतःला कसे सावरायचे हे मयुरी करायला शिकली आहे. तुम्ही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यातूनही नक्कीच सावरेल. त्यामुळे सावध रहा असा सूचक इशाराच तिने टीकाकारांना केला आहे. आशुतोषला गमावल्यानंतर मी खूप रडले असे एका मुलाखतीत तिने म्हटले होते. पण यातून सावरण्याचे बळ मला मिळाले आहे. त्यामुळे कोणी कितीही वैचारिक चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. अशा गोष्टी हाताळायला मी शिकली आहे, असेच तिला यातून सुचवायचे आहे.