ठरलं तर मग या मालिकेमुळेच जुई गडकरी आता महाराष्ट्राची लाडकी नायिका बनली आहे. अभिनयाच्या जोडीला जुई सामाजिक बांधिलकी देखील जपताना दिसत असते. दरवर्षीची तिची दिवाळीची सुरुवात आश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत होत असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या दिवसाचा आनंद वर्षभर मला ऊर्जा देतो असे ती सांगते. गेली १९ वर्षे ती अशाच पद्धतीने तिची दिवाळी साजरी करत असते. या लोकांच्या मदतीसाठी तिचे काही मित्र देखील पुढे आले आहेत. या उपक्रमात चाहत्यांचाही सहभाग असावा म्हणून जुईने ज्याला शक्य होईल त्याला तिने एक आवाहन केले आहे.
तुमचे पैसे चुकीच्या हातात जाणार नाहीत याचीही तिने खात्री दिली आहे. यासंदर्भात जुईने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की, माझे इन्स्टग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत. पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छिते की, दरवर्षीच्या दिवाळीची सुरुवात मी पनवेल इथल्या नेरे गावातील शांतीवन आश्रमात जाऊन करते. मी आणि माझे काही मित्र आहेत आम्ही सगळे मिळून त्या आश्रमात गेली १९ वर्षे जाऊन दिवाळी साजरी करतो. आश्रमात कृष्ठरोगी, निराधार आजी आजोबा आहेत. आश्रम सजवून, रांगोळी काढून एक दिवस आम्ही तिथे त्यांच्यासोबत जेवतो, नाच गाण्याचे कार्यक्रम करतो. अशी दिवाळीची सुरूवात त्यांच्याबरोबर करत असताना त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसतो.
तिथल्या कृष्ठरोगीच्या उपचारासाठी आम्ही सगळे जमेल तसे काही पैसे जमवतो. जर तुम्हालाही त्यांची मदत करायची असेल तर तुम्हीही मदत म्हणून देऊ शकता. त्याचे बँक डिटेल्स मी तुम्हाला देईल. विश्वास ठेवा तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाहीत किंवा त्याचा गैरवापर होणार नाही. एका चांगल्या कामासाठीच त्याचा उपयोग होणार आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे एक दिवस त्यांच्यासाठी द्यायला काहीच हरकत नाहीये. त्यांचे आशीर्वाद घेऊन आमचं पुढचं वर्ष छान जातो. त्यामुळे आम्हाला त्यांचे आशीर्वाद खूप गरजेचे आहेत. आम्ही १९ वर्ष सातत्याने तिथे जात आहोत. वसुबारस आनंदाने साजरी करतो. तिथे गेल्यावर त्यांचे चेहरे आनंदून गेलेले असतात कारण वर्षभर ते या दिवसाची वाट बघत असतात.
तेव्हा असं वाटतं की आपण का नाही अशा लोकांना जवळ करायचं ज्यांचं कोणीच नाहीये. डॉ नितीन आरेकर हे प्रोफेसर आहेत, आम्ही कॉलेजचे सगळे मित्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे जातो आणि दरवर्षी दिवाळी साजरी करतो. तुम्हालाही त्यांची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी मला डीएम करा, असे जुई म्हणते. जुईच्या या आवाहनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे तर मदतीचेही हात पुढे केले आहेत.