एखाद्या गोष्टीवर आपली मतं मांडण्यासाठी कलाकार मंडळी सोशल मीडियाचा आधार घेतात. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. गेल्या वर्षी तिने लिहिलेली बाई ब्रा आणि बुब्जची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे हेमांगी कवी चांगलीच चर्चेत आली होती. कामाच्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी एकच टॉयलेट असेल तर पुरुषांनी कमोड कसं वापरावं याबद्दलही तिने एक भलीमोठी पोस्ट लिहिली होती. अर्थात तिने व्यक्त झाल्याने मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिचं कौतुक केलं होतं. कामाच्या ठिकाणी असे त्रास अनुभवायला मिळतात. पण कोणीच यावर उघडपणे बोलत नाही अशी खंत प्रत्येकाने व्यक्त केली होती.
तिच्या या दोन्ही पोस्ट सेलिब्रिटी विश्वातच नव्हे तर सामाजिक स्तरावर देखील तुफान व्हायरल झाल्या होत्या. खरं तर हेमांगीचे बिनधास्तपणे व्यक्त होणं अनेकांना खटकतं, तर काहींना ते मान्यही असतं. यावरूनच हेमांगी काही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. लोक मला हिणवतात, ट्रोल करतात. सुरुवातीला मी या गोष्टींचा विचार करायचे पण आता त्याला महत्व देत नाही असे हेमांगी म्हणते. ट्रोल करणाऱ्यांच्या पासून वाचावं म्हणून मी माझं अकाउंट कधीही बंद केलं नाही किंवा कमेंट डिलीट केल्या नाहीत. उलट ट्रोलर्सने माझ्या पोस्ट चर्चेत आणल्या त्यामुळे अनेक मुली माझ्याशी जोडल्या गेल्या आणि मनमोकळेपणाने बोलु लागल्या. यातून चर्चा झाली, प्रत्येकीच्या मनातली खदखद व्यक्त झाली.
या ट्रोलर्सनी मला नक्कीच मोठं केलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या बोलण्यामुळे कोणी आपल्याला ट्रोल करतंय, यामुळे आपलं करिअर संपेल याचा विचार ती कधीच करत नाही. इंडस्ट्रीत काम मिळाले नाही तरी मला याची भीती कधीच वाटणार नाही. या व्यतिरिक्तही मी कुठेही काम करू शकते. काही दिवसांपूर्वीच लेक माझी दुर्गा या मालिकेतून हेमांगीची एक्झिट झाली आहे. तिचं शहर होणं या नव्या प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वरूण नार्वेकर यांच्या सिरीजमधूनही ती महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आगामी नवनवीन भूमिकांसाठी हेमांगीस खूप खूप शुभेच्छा.