माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत सूनयना केरकर हे पात्र दाखल झाले होते. मालिकेत यशच्या लग्नासाठी मिथिला काकूने सूनयनाचे स्थळ सुचवले होते. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची फसवणूक झाली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सूनयनाचे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने साकारले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात धनश्रीला एका वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मुंबई, हैद्राबाद सारख्या ठिकाणी या वेबसिरीचे शूटिंग होणार आहे. झीवर टेलिकास्ट करण्यात येईल असा एक मेल आला होता. हा मेल तिला बालाजी टेलिफिल्म्सकडून आला असल्याने तिला या कामाबाबत उत्सुकता वाटू लागली. कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स या इमेल आयडीवरून माहिती मिळाली होती.

टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून तिच्याबाबतची माहिती मिळाली असे त्यांच्याकडून तिला सांगण्यात आले होते. पुढील प्रोसेससाठी डॉक्युमेंटस पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु मुंबई ऑफिस बंद असल्याने ह्या सर्व कामकाजाची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले होते. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी बालाजी २० असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. याबाबत कुठलीही शंका तिच्या मनामध्ये आली नाही कारण यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट केले होते. १० फेब्रुवारी २०२२ रोजी शूटिंगनिमित्त धनश्रीला हैद्राबादला विमानाने प्रवास करून जायचे होते. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले.

त्यावेळी इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला. त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून २२ हजार ३४८ रुपये एवढी तिकीटाची रक्कम गुगलपे करण्यास सांगितली. गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल तिला आला. सकाळी फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी म्हणून याबाबत तिने दिवसभर पाठपुरावा सुरू ठेवला होता. अनेक मेसेजेस आणि फोन कॉल्स करूनही पलीकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिने तक्रार करेन असा मेसेज केला. त्यावेळी फक्त वाट पहा एवढाच मेसेज त्यांच्याकडून मिळाल्याने धनश्रीला तिची फसवणूक झाली असल्याचे वाटू लागले.
परंतु बालाजी टेलिफिल्म्स असे खोटे कसे वागू शकतात म्हणून तिने मुंबईला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घेतली आणि घडलेला प्रकार कळवला. त्यावेळी धनश्रीला ज्या व्यक्तींचे फोन आले होते त्यांचे नंबर दाखवले परंतु आम्ही ह्या व्यक्तींना ओळखत नाही. हे नंबर ओळखीचे नाहीत असेही तिला सांगितले. याबाबत आम्ही नक्की चौकशी करू असे तिला आश्वासन तिला दिले. अर्थात आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर धनश्रीने ताबडतोब संबंधित नंबर देऊन त्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु बालाजी टेलिफिल्म्सचा डोमेन कोणीही बनवू शकतं का असा प्रश्न आता तिला भेडसावत आहे. असे असेल तर कुणाच्याही बाबतीत फसगत होऊ शकते. त्यामुळे धनश्रीने कलाक्षेत्रातील कलाकारांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.