Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील खाष्ट सासू ​भूमिकांसाठी गाजलेला चेहरा
actress daya dongre
actress daya dongre

मराठी सृष्टीतील खाष्ट सासू ​भूमिकांसाठी गाजलेला चेहरा

एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्य अभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ याही अभिनेत्री आणि गायिका. तर पणजोबा कीर्तनकार, त्यामुळे कलेचा वारसा त्यांना पिढीजात लाभला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची ईच्छा होती. शालेय जीवनापासूनच शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणी कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी गाणं सादर केलं होतं. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना संगीत साधना मागे पडली.

actress daya dongre
actress daya dongre

पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला. येथूनच त्यांना अभिनयाची विशेष गोडी निर्माण झाली. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या. शिक्षण चालू असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली. लग्नानंतर पती शरद डोंगरे यांची कलेच्या आवडीला खंबीर साथ दिली. तुझी माझी जमली जोडी रे, गजरा, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून. अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. यातील बहुतेक खलनायिकेच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. खाष्ट आणि तितकीच कजाग सासू त्यांनी सहज सुंदर अभिनयाने अतिशय चांगली रंगवली.

superstar daya dongre
superstar daya dongre

मराठी सृष्टीतील ललिता पवारनंतरची खलनायिका कोण असे म्हटले तर दया डोंगरे हेच उत्तर मिळू लागले. मराठी सोबतच आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग अशा हिंदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या. खूप वर्षांपूर्वी दया डोंगरे यांनी अभिनयातून निवृत्ती स्वीकारली असली तरी, आजही त्यांनी निभावलेल्या भूमिकांना मराठी प्रेक्षक विसरणे केवळ अशक्यच. त्यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन २०१९ साली नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आपले कलाकार समूहातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना सुदृढ आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.