फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीचे आयपीएस बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या टास्कला सामोरे जावे लागत आहे. रोपचा टास्क पूर्ण केल्यावर कीर्ती तिसरा रँक पटकावते. हे पाहून पाटील मॅडम तिच्यावर खुश होतात. एकीकडे कीर्ती एकएक टप्पा पुढे सर करत असताना मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. बराचवेळ झाला जान्हवी घरी आली नसल्याने जिजीआक्का तिची काळजी करत असतात. दिलीपच्या घरून निघाल्यावर जान्हवीला रस्त्यात दोन मुलं अडवतात. जान्हवीची छेड काढताच एक कार तिथे दाखल होते. या कारमधून कविता बाहेर येऊन ह्या दोन मुलांना काठीने मारायला सुरुवात करते. ते पाहून छेड काढणारी मुलं तिथून पळ काढतात.
आपला बचाव आपणच केला पाहिजे असे कविता जान्हवीला समजावून सांगते. जान्हवीला कविताचा चेहरा आठवतो ती शुभमसोबत लग्न करणार होती मात्र ऐनवेळी कविता लग्नमंडपातून पळून गेलेली असते हे तिच्या लक्षात येते. कविता जर मला घरी सोडवायला आली तर जिजीआक्का तिला नक्कीच ओळखतील पण तरीही कविता घरी येते आणि जिजी आक्काना लग्नातला तो प्रसंग आठवतो. शिकलेल्या मुलासोबतच लग्न करणार असल्याने कविता लग्न मंडपातून पळून गेलेली असते हे जिजी आक्काना आठवतं आणि त्या कविताला आपल्या समोर पाहून तिच्यावर राग व्यक्त करतात. मालिकेत कविताचे पात्र साकारले आहे अभिनेत्री ‘भाग्यश्री न्हाळवे’ हिने. भाग्यश्री न्हाळवे ही चित्रपट मालिका अभिनेत्री आहे.
कलर्स मराठी वरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत रमाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे भाग्यश्रीला प्रसिद्धी मिळाली, परफ्युम, स्त्रीलिंगी पुल्लिंग या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटात भाग्यश्रीला सूर्याजीच्या पत्नीची भूमिका निभावली होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई हिंदी मालिकेत बाणाबाई मल्हारराव होळकर हे पात्र साकारले होते. मालिका चित्रपट असा प्रवास सुरू असताना म्युजिक व्हिडिओतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत ती कविताची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. शुभम सोबत कविताचे लग्न जुळले होते, मात्र ती लग्नाच्या दिवशीच पळून गेली होती. कविता शुभमच्या आयुष्यात परत आल्याने मालिकेला कोणते वळण मिळणार हे लवकरच समोर येईल.