विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामीकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काल दक्षिण आफ्रिका आणि भारताचा सामना रंगला होता. ५० धावा केल्यानंतर विराटचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी अनुष्का आपल्या मुलीसोबत स्टेडियममध्ये हजर होती. त्याचवेळी कॅमेरामनची नजर वामीकावर पडली आणि तिचा फोटो प्रथमच कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. मात्र आपल्या मुलीचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून अनुष्काला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या फोटोंवरून नाराजी दर्शवत अनुष्काने तमाम जनतेला एक आवाहन केलेले पाहायला मिळत आहे.
आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पाहून तीने एक प्रतिक्रिया दिली आहे त्यात ती म्हणते की, आम्हाला कल्पना नव्हती की काल स्टेडियममध्ये आमच्या मुलीचे फोटो काढले जात आहेत. त्यानंतर ते मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येऊ लागले. तिचे फोटो कोणीही क्लिक करू नये. किंवा प्रसिद्ध करू नयेत या भूमिकेवर आम्ही आताही ठाम आहोत. अशी विनंती अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवरून केली आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्का आणि विराटच्या लेकीचा वामीकाचा जन्म झाला. जन्मानंतर विराट आणि अनुष्का सोबत फिरायला जाताना वामीका कित्येकदा स्पॉट झाली. मात्र आपल्या लेकीचा चेहरा त्यांनी कायम कॅमेऱ्यापासून लपवून ठेवलेला पाहायला मिळाला.
एवढेच नाही तर वामीकाचे पहिले बोबडे बोल तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. मात्र तिचा चेहरा दाखवण्याचे आवर्जून टाळले. अर्थात हा सर्वस्वी निर्णय घेण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी यागोदरच म्हटले होते. अनेकदा अशा फोटोंवरून खिल्ली उडवली जाते मिम्स बनवले जातात. ह्या गोष्टी घडू नयेत याची काळजी घेऊनच त्यांनी वामीकाचे फोटो मिडियापर्यंत पोहोचू दिले नव्हते. बॉलिवूड सृष्टीत असेच नियम बऱ्याच कलाकारांनी आपल्या मुलांबाबत संभाळलेले पाहायला मिळाले. मात्र फार काळ ते कॅमेऱ्यापासून स्वताच्या मुलांना लपवू शकलेले नाहीत. अक्षय कुमारची लाडकी लेक नितारा हिला देखील बरेच वर्षे कॅमेऱ्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. मात्र कालांतराने तिचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.