मराठी तसेच हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. रात्री १ वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पारशीवाडा येथे आज दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती शेंडे, ऋषीकेश आणि ओंकार अशी दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. सुनील शेंडे यांची सून जुईली शेंडे या शिवसेनेत कार्यरत आहेत.
विलेपार्ले येथील विधानसभा समन्वयक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव, दौड, खलनायक अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. निवडुंग, जसा बाप तशी पोरं, मधुचंद्राची रात ही त्यांचे काही मराठी चित्रपट. आपल्या कारकिर्दीत त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका बजावलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. शांती ही ९० च्या दशकातील लोकप्रिय हिंदी मालिका यात सुनील शेंडे यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. शाहरुख खानची पहिली मालिका सर्कस याचाही ते एक महत्वाचा भाग बनले होते. शाहरुखच्या बदलांची बापूजी हि त्यांची भूमिका विशेष गाजली. गेल्या काही वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दुरावलेले दिसले.
गहिरे पाणी, गंगाधर भावे, चेहरा, जीवन एक संघर्ष, कधी अचानक, निदान, जिद्दी, वजीर, घायल, हस्ती, आपली माणसे. जसा बाप तशी पोरे, अंगार, नरसिंह, मधुचंद्राची रात्र, शांती, जमलं हो जमलं, बजरंगाची कमाल, तू सुखकर्ता अशा नानाविध मराठी हिंदी मालिका तसेच सिनेमा मधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. बहुतेक कलाकार मंडळी आपल्या उतारवयात असताना अभिनय क्षेत्राला रामराम ठोकतात असेच काहीसे सुनील शेंडे यांच्याबाबत झाले असे म्हणावे लागेल. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.