सयाजी शिंदे यांचे निसर्गप्रेम सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात ठिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याची जबाबदारी ते गेली अनेक वर्षे पार पाडत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मध्ये येणारी झाडे मुळासकट आणून त्यांनी ती जगवली आहेत. हा सर्व खटाटोप खूप खर्चिक असला तरी केवळ पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी ते मोठी मेहनत घेत आहेत. नुकतेच सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सयाजी शिंदे यांनी आपल्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. आईसोबतचे काही खास किस्से उपस्थितांना मात्र विचार करायला लावणारे होते.
यावेळी विमान प्रवासात घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. आई वडिलांएवढं जगात दुसरं कुठलं चांगलं विद्यापीठ नाही असे मत सायाजी शिंदे व्यक्त करतात. कारण आईवडिलांनी केलेल्या काही गोष्टी नकळतपणे माझ्याकडे आलेल्या आहेत. आईचे किस्से भरपूर आहेत त्यातला एक किस्सा असा होता की माझा भारती नावाचा पहिलाच सिनेमा १०० दिवस चित्रपटगृहात चालला होता. या सिनेमात मी टायटल रोल केला होता. सिनेमा आईने पाहावा म्हणून मी तिला पहिल्यांदा विमानातून घेऊन गेलो होतो. विमानात बसल्यावर फर्स्टक्लासचं तिकीट होतं तेव्हा आम्ही तिथे बसलो. त्यानंतर जेवणाची दोन ताटं त्यांना दिली. हे पाहून सयाजी शिंदे यांच्या आईने एअर होस्टेसला, ए बया इकडे ये असे म्हणून हाक मारली.
तेव्हा विमानात बसलेली सगळी लोकं आमच्याकडे बघू लागली, की कोण बाई नऊवारी साडी नेसून अशी हाक मारते. एअरहोस्टेस आल्यावर आईने तिला एक ताट घेऊन जायला सांगितलं आणि आम्हाला एक ताट पुरेसं आहे असं म्हटलं. तेव्हा एअरहोस्टेसने ते ताट तुमचंच आहे आणि असुदेत असं सांगितलं. त्यावर आईने म्हटलं की, हे एवढं जेवण आम्हा दोघांना पुरेसं आहे. दुसऱ्या ताटातलं जेवण तू गाईला चार तिच्या मुखात तरी दोन घास जातील. आईचे हे विचार पाहून मला तिचा खूप अभिमान वाटतो. असे आणखी बरेचसे किस्से आहेत तिचे. एकदा पुण्याहून साताऱ्याला जाताना एक सिन शूट करायचा होता. त्या सीनमध्ये मला फक्त बघायचं होतं. हा सिन पूर्ण केल्यावर खिशातले एक लाख रुपये त्यांनी आईसमोर ठेवले.
आईने विचारले की हे एवढे पैसे कशाचे? तेव्हा सयाजी शिंदे म्हणाले की मी आत्ता जे काम केलं त्याचे हे एक लाख रुपये आहेत. तेव्हा त्यांच्या आई म्हणाल्या होत्या की, त्यांना एक अक्कल नाही पण तुला अक्कल नाही होय, एवढे पैसे कशाला घ्यायचे. अशा पद्धतीने जगाकडे बघायला लावणारी आपली आई ५०० वर्ष जगावी अशी माझी ईच्छा आहे. मला माहिती आहे एवढी वर्ष ती जगणं शक्य नाही. पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तिने माझ्यासोबत असावं अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी आईची तुला करून तिच्या वजनाईतक्या देशी झाडांच्या बिया महाराष्ट्रभर लावत आहे. त्याच्या फुलांच्या सुगंधातून, त्या झाडांच्या सहवासातून ती कायम माझ्यासोबत राहील.