गेल्या काही दिवसांपासून कालासृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्याच महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी नुक्कड या लोकप्रिय हिंदी मालिकेतील अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी निवळते न निवळते तोच अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूड सृष्टी नव्हे तर पूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात आता आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नुक्कड लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे देखील निधन झाले आहे. समीर खाखर हे ७० वर्षांचे होते.
मधल्या काळात ते देश आणि अभिनय क्षेत्र सोडून अमेरिकेत गेले होते. परंतु पुन्हा मायदेशी परतल्यावर त्यांनी वेबसिरीज आणि मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते. समीर खाखर हे नुक्कड मालिकेत एका दारुड्याच्या भूमिकेत दिसले होते. यामध्ये त्यांनी साकारलेला खोपडी प्रेक्षकांना विशेष भावला होता. खोपडीची भूमिका सतत व्यसनाच्या आहारी गेलेली दाखवली होती, ही भूमिका समीर यांनी खूपच सुरेख निभावली होती. सर्कस या आणखी एका लोकप्रिय मालिकेने त्याना प्रसिद्धी मिळवून दिली होती. समीर खाखर हे १९८७ साली अभिनय क्षेत्रात दाखल झाले होते. जवाब हम देंगे चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. श्रीमान श्रीमती, नया नुक्कड, अदालत संजीवनी अशा हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले.
मेरा शिकार, शेहेंशाह, गुरू, नफरत की आंधी, परिंदा, पुष्पक अशा चित्रपटातून समीर यांनी छोट्या मोठ्या पण तेवढ्याच महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. गेल्या वर्षीच्या सन फ्लॉवर वेबसिरीज मध्ये त्यांनी मिस्टर टंडन पात्र साकारले होते. तर पुराना प्यार शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी पांडुरंगची व्यक्तिरेखा साकारली होती. समीर खाखर यांना बऱ्याचदा दुय्यम भूमिकेत पाहिले गेले. पण भूमिका छोटी असो किंवा मोठी, त्याची लांबी रुंदी न पाहता त्यांनी त्या आपल्या सहजसुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वठवल्या होत्या. त्याचमुळे नुक्कड या पहिल्याच मालिकेतला त्यांचा बेवडा खोपडी प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहिला आहे. समीर खाखर यांच्या निधनाने मालिका सृष्टीत हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.