रोजच्या जीवनात रात्री अपरात्रीचा प्रवास करत असताना प्रत्येकालाच चांगलेच वाईट असे अनुभव आलेले असतात. कलाकारांना बऱ्याचदा लेटनाईट शूटमुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शो मधील अभिनेत्याला असाच एक अनुभव आला आहे. विक्रोळीचा शाहरुख अशी ओळख असलेल्या पृथ्वीक प्रतापने आपल्यासोबत घडलेल्या एका अनुभवाचा खुलासा केला आहे. जेणेकरून इतर कलाकार किंवा प्रवासी सतर्क राहतील. या अनुभवबाबत पृथ्वीक म्हणतो की, शुक्रवारी २१ जानेवारी रात्री ९ च्या दरम्यान मी ग्रीन वॅली स्टुडिओज काशिमीरा, मीरारोड शूटिंग आटपून घरी जाण्यास निघालो. नेमकी स्वताची गाडी आणली नाही म्हणून ओला उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो.

पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही घडेना. शेवटी वैतागून चालत स्टुडिओ गेट मधून बाहेर पडलो. आणि एका रिक्षा वाल्याला हात दाखवून विचारलं, ठाणे? त्यानेही तडक गाडी वळवली. मी बसलो, मीटर पडलं आणि आम्ही निघालो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून त्याने गाडी कांदिवली दिशेला वळवली मी त्याला म्हणालो थांब. आपल्याला ठाण्याला जायचंय गाडी घोडबंदर ने घे त्यावर त्याने इधर से भी जाता है गाडी ठाणे को. असं म्हणत त्याच्या मनाविरुद्ध रिक्षा फाउंटन हॉटेलच्या दिशेने वळवली. पण तो गाडी घोडबंदरच्या दिशेने नेण्याऐवजी वसईच्या दिशेने नेऊ लागला. मी पुन्हा त्याला म्हणालो घोडबंदर मागे आहे, फाउंटनच्या रस्त्याने जायचंय आपल्याला त्यावर तो चिडला. आणि म्हणाला मेरे को मत सिखा किधर क्या है, चुपचाप बैठ.

मी गाडी थांबव म्हणत असताना देखील तो वसईच्या दिशेने गाडी नेऊ लागला. मी तडक १०० नंबर वर फोन केला माझ्यासोबत घडणारा प्रकार पोलिसांना सांगितला. रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगतोय हे कळताच त्या रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा फाउंटनच्या दिशेने वळवली. आणि म्हणाला पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने. आणि फाउंटन हॉटेल जवळ त्याने गाडी थांबवली. मी तडक गाडीतून उतरलो त्याचा फोटो काढला आणि त्याला म्हणालो कि तेरा आयकार्ड, परमिट जो कूछ होगा दिखा. त्यावर हुज्जत घालत तो म्हणाला तू आरटीओ वाला है क्या? तेरेको क्यू दिखाऊ, पोलीस को क्यू फोन लगाया? मी त्याला शांतपणे म्हणालो थांब आता जे पोलीस येतील त्यांच्याशी पण ओळख करून घे.
साधारण १० मिनिटे हुज्जत घातल्यानंतर त्याने तिथे येणारे काही पोलीस पाहिले आणि तिथून धूम ठोकली. मी पोलिसांना फोन केल्यानंतर अगदीच १५ मिनिटांत माझ्या मदतीला ४ पोलिसवाले तिथे हजर होते. या सगळ्याच श्रेय सिनिअर पीआय वसंत लबडे यांना जातं, त्यांनी तातडीने मदत पाठवली म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो. लिहिण्याचं कारण इतकचं कि माझे कित्येक मित्र मैत्रीण मीरारोड मध्येच शूटिंग करतात. बऱ्याचदा त्यांचं शूटिंग संपायला मध्यरात्र उलटते त्यामुळे त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी. आणि महाराष्ट्र पोलिसांमुळे तितकाच निर्धास्त हि राहावं. सोबत रिक्षा वाल्याचा नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडतोय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे सुद्धा कळेल. नाव राजेशकुमार हुबलाल यादव (रिक्षा नंबर एम एच०२ ई क्यू ०१७२).