लागीरं झालं जी या गाजलेल्या मालिकेतील कलाकारांनी नुकतेच एक आवाहन करत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे. मालिकेच्या कलाकारांनी असे का म्हटले आहे आणि हे प्रकरण नेमके काय आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात. झी मराठी वाहिनीवर लागीरं झालं जी ही मालिका प्रसारित केली जात होती. या मालिकेतील फौजिची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अभिनेता डॉ ज्ञानेश माने यांचे १४ जानेवारी रोजी अपघाताने दुःखद निधन झाले होते. रोटी घाटातून जात असताना वाहनाला झालेल्या अपघातामुळे ते बेशुद्ध होते उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना १४ जानेवारीच्या सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ ज्ञानेश माने हे बारामतीतील झारगडवाडी गावचे एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखले जात होते. सोलापूर गॅंगवॉर, हंबरडा, यद्या, पळशीची पीटी, निरपराध काळूबाईच्या नावानं चांगभलं अशा चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी स्वतःची अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र ही बातमी वृत्त माध्यमातून दाखवत असताना मालिकेतील कलाकारांचे फोटो त्यांच्यासोबत जोडले जात होते. त्यामुळे अनेकांनी बातमी न वाचताच मालिकेतील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण याचेच निधन झाले असल्याचे समजले. त्यामुळे मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर येऊन ही अफवा असल्याचे सांगितले आहे.
नितीश चव्हाण अगदी ठणठणीत असून तो आमच्यासोबत आहे असे म्हटले आहे. लागीरं झालं जी या मालिकेचे चित्रीकरण ज्या गावात झाले होते त्या चांदवडी गावातील मंदिरात हे कलाकार आज एकत्र जमले होते. तिथूनच मालिकेतील आज्या म्हणजेच नितीश चव्हाण आणि समाधान मामा म्हणजेच अभिनेते संतोष पाटील यांनी एकत्र येऊन चाहत्यांना आवाहन केलं आहे की नितीश चव्हाणच्या निधनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. नितीश याबाबत म्हणतो की, मी सुखरूप आहे मला काहीही झालेलं नाही सोशल मीडियावरची बातमी तुम्ही व्यवस्थित वाचा, आम्ही आता चांदवडीमध्ये आलेलो आहोत.
इथलं ठिकाणही तूमच्या परिचयाचं आहे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन नितीशने त्याच्या चाहत्यांना केलेले आहे. दरम्यान मालिकेतील शितलीचे वडील म्हणजेच नानाची भूमिका साकारणारे कलाकार देवेंद्र देव यांनी देखील म्हटले आहे की, मला सकाळपासूनच अनेकांचे फोन येत आहेत. मालिकेत फौजिची भूमिका साकारणारे डॉ ज्ञानेश माने यांचे अपघातात निधन झाले. मात्र अनेकांनी नितीशचेच निधन झाले असे म्हणून मला फोन यायला लागले आहेत, नितीश माझा जावई खूप चांगला आहे आणि व्यवस्थित आहे, आणि आम्ही आता चांदवडीत आहोत काहीही काळजी करू नका. आणि आवर्जून सगळ्यांना सांगा की ही खोटी बातमी आहे.