Breaking News
Home / मराठी तडका / आर्थिक परिस्थितीमुळे फक्त कांदा खाऊन काढले होते दिवस.. मराठी सृष्टीतील बाप्पाच्या संघर्ष काळातील खास आठवणी
deepak shirke
deepak shirke

आर्थिक परिस्थितीमुळे फक्त कांदा खाऊन काढले होते दिवस.. मराठी सृष्टीतील बाप्पाच्या संघर्ष काळातील खास आठवणी

थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज, हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर या आणि अशा कितीतरी हिंदी मराठी चित्रपटातून आपल्या जबरदस्त अभिनयाने खलनायक तसेच सहाय्यक भूमिका रंगवणाऱ्या दीपक शिर्के यांच्या प्रवासाबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. त्यांच्या याच अपरिचित प्रवासाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. दीपक शिर्के यांचा जन्म २९ एप्रिल १९५५ साली मुंबईतील गिरगावातील चिरा बाजार येथे झाला. आर्थिक सुबत्ता असल्याने दीपक शिर्के यांचे बालपण अतिशय मजेत गेले. मात्र वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्याने घरची परिस्थिती बिकट झाली. घराचे छप्पर हरवते तशी त्यांची अवस्था झाली.

deepak shirke
deepak shirke

एकाएकी श्रीमंतीतून त्यांनी अगदी विरुद्ध दिशा अनुभवली. थोरला या नात्याने लहानपणीच खांद्यावर जबाबदारी आली. घरी वाल सोलून देण्याचे काम करत असताना त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशात पाव आणले जायचे त्याच्यासोबत कांदा खाऊन त्यांनी दिवस काढले होते असे जवळपास दीड वर्षे त्यांनी काढले. पुढे त्यांची आई शाळेत नोकरी करून पाच मुलांचे पालनपोषण करायची. यातच आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केले. दीपक शिर्के यांचे शाळेत फारसे मन रमले नाही. पण शाळेत होणाऱ्या नाटकाच्या तालमीला ते हजर राहायचे. यातूनच नाटकाची आवड निर्माण झाली. साहित्य संघाच्या  नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या.

actor deepak shirke
actor deepak shirke

हौशी नाटक करताना व्यावसायिक नाटकांकडे ते वळले. मात्र इथे स्ट्रगल करताना आणि काम मिळवताना  कुठल्याही भूमिकेत फिट बसत नसल्याचे कारण सांगण्यात येऊ लागले. मग मिळेल त्या भूमिका करण्याचे त्यांनी ठरवले. टूरटूर या नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे सोबत त्यांची चांगली ओळख झाली होती. लक्ष्मीकांत यांनीच पुढे मला मराठी चित्रपटातून काम मिळवून दिले ‘ही त्याचीच मेहरबानी’ असे दीपक शिर्के म्हणतात. धिप्पाड शरीरयष्टीमुळे सुरुवातीला खलनायक ढंगाच्या भूमिका मिळाल्या. इरसाल कार्टी हा त्यांनी अभिनित केलेला पहिला चित्रपट. एक शून्य शून्य या मालिकेमुळे दीपक शिर्के प्रचंड लोकप्रिय झाले. आक्रोश या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.

तिरंगा चित्रपटातील गेंडा स्वामी, अग्निपथ मधील अण्णा शेट्टी, कालिया अशा खलनायकी ढंगाच्या भूमिका त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अजरामर केल्या. दीपक शिर्के यांना कठीण परिस्थितीच्या काळात आर्थिक हातभार मिळाला तो पत्नीमुळे. दीपक शिर्के यांच्या पत्नी गार्गी शिर्के या पीएचडी धारक. त्यामुळे आर्थिक चणचण जाणवत नव्हती असे दीपक शिर्के आवर्जून म्हणतात. पांडू या वेबसिरीजच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र बऱ्याच काळापासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले पाहायला मिळाले आहेत. अभिनय क्षेत्रात कसलेला हा कलाकार लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येवोत हीच एक सदिच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.