मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक चिरतरुण अभिनेता म्हणून अशोक शिंदे यांना ओळख मिळाली आहे. अशोक शिंदे यांचे वडील मेकअप आर्टिस्ट होते. इलेक्ट्रिकल्स शाखेची पदवी मिळवलेल्या अशोक यांनी वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत सुरुवातीला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. कुठलेही काम मोठे किंवा छोटे नसते, कामाप्रती निष्ठा असावी ही शिकवण त्यांना आई वडिलांकडूनच मिळाली होती. त्यांचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. देखणा आणि रुबाबदार चेहरा पाहून त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळत गेली. पुढे चित्रपट, मालिकामधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या.
दामिनी, घरकुल, सुवासिनीची सत्व परीक्षा, दुहेरी, छत्रीवाली, लालबागची राणी, रंगत संगत, जखमी कुंकू, भक्ती हीच खरी शक्ती, काकण, मेनका उर्वशी मधील अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. अल्का कुबल आणि अशोक शिंदे यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्रित काम केलं. त्यामुळे या दोघांची जुळून आलेली मैत्रीची केमिस्ट्री आजही अशीच अबाधित आहे. अशोक आपल्या कुटुंबाबद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. मात्र त्यांच्या मुली आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्या आहेत. पूजा शिंदे या अशोक शिंदे यांच्या पत्नी. नेहा आणि योजना या त्यांच्या दोन लाडक्या मुली. मुलींच्या संगोपणात त्यांनी कधीच आडकाठी आणली नाही. आपले करिअर निवडायचेही स्वातंत्र्य त्यांना दिले होते.
मुलींना करिअरमध्ये वडिलांचे नाव वापरायचे नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र निर्भर असलेल्या त्यांच्या मुली आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. नेहाने एमबीएचे शिक्षण घेतले त्यानंतर ती बॉलिवूड मध्ये काम करू लागली. अक्षय कुमारची हरिओम कंपनी तसेच टिप्ससाठी तीने गाणी निर्मित केली आहेत. दुसरी मुलगी योजना हिने हाईप कॅसल या नावाने स्वताचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. मुलींनी स्वबळावर करिअर घडवल्याने त्यांचा अभिमान असल्याचा अशोक म्हणतात. कलाकारांची मुलं अभिनय क्षेत्रातच दाखल होतात हा समज मराठी सृष्टीत तरी खूप तुरळक पहायला मिळतो. अशोक शिंदे यांच्या मुलींचंही नक्कीच कौतुक करायला हवं.