साधारण दोन तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने तिचा पती अनिकेत विश्वासराव यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्नेहाने अनिकेतवर मारहाण केल्याचे आरोप लावले होते. हे प्रकरण आता खूपच चिघळत चालल्याचे जाणवत आहे. लग्नानंतर काही काळातच अनिकेतने पत्नी स्नेहाला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली एवढेच नाही तर पाहुण्यांसमोर देखील तो तिला कमी लेखत असे.
आपली पत्नी आपल्या पेक्षा वरचढ ठरायला नको आपल्या पेक्षा लोकप्रिय ठरायला नको या हेतूने तो तिला कायम कमी लेखत असे, लोकांसमोर तो तिला अपमानास्पद वागणूक देत असे. मारहाण देखील करत असे. मारहाण करताना त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे स्नेहाने आपल्या या तक्रारीत म्हटले होते. डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान माझी छळवणूक झाली असल्याचे स्नेहाने अनिकेत वर आरोप लावले होते. स्नेहा या काळात पुण्यात असलेल्या तिच्या माहेरी दाखल झाली आणि तिने अनिकेत विरोधात तक्रार नोंदवली होती. स्नेहाच्या आरोपांवर अनिकेत विश्वासराव याने नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे या आरोपांबाबत तो म्हणतो की स्नेहा ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच माहेरी निघून गेली होती. तिलाच माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं. त्यासाठी तिने माझ्याकडे पोटगी म्हणून २५ लाखांची मागणी देखील केली होती. मी ती देण्यास नकार दिला होता. तिची छळवणूक होते हे सांगायला तिला १० महिने का लागतात?.. गेले दहा महिने ती गप्प का होती?.. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिनं ह्या सर्व गोष्टी का उघड केल्या.
हाच दिवस तिने का निवडला, तिला व तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला मानसिक त्रास देण्याचे षडयंत्र रचले आहे.. अशी प्रतिक्रिया अनिकेत विश्वासराव याने दिलेली आहे. दरम्यान अलंकार पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी स्नेहाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अलंकार पोलीस चौकी स्नेहा चव्हाण राहत असलेल्या हद्दीत येत असल्याने तिने ही तक्रार येथे नोंदवली आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी तिने अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात कालच तक्रार दाखल केली होती या प्रकरणाबाबत तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे.