मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शो मधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. मॉडेलिंग आणि अभिनया सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले होते. झी मराठी वाहिनीवर ह्या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, आजही गडकिल्ले फिरणारी मंडळी त्यांच्या मालिकेची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुत्रसंचालिका राणी गुणाजी या मिलिंद गुणाजी यांच्या पत्नी आहेत. कल्पांतर या मराठी मालिकेत एकत्रित काम करत असताना मिलिंद आणि राणी गुणाजी यांची भेट झाली होती. या भेटीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. मिलिंद गुणाजी त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होते. कल्पांतर ही त्यांनी अभिनित केलेली पहिलीच मालिका तर त्यावेळी राणी गुणाजी नाटकांमधून सक्रिय होत्या. त्यांनी हम बने तूम बने या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. शिवाय कुकरी शोच्या होस्ट म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. अभिषेक गुणाजी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेकने मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्याशी त्याची खूप जवळची मैत्री आहे अनेकदा हे दोघेही मित्र एकत्रित पाहायला मिळतात. नुकतेच अभिषेक गुणाजीने त्याची गर्लफ्रेंड राधा पाटील हिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे. अभिषेक आणि राधाची एंगेजमेंट अगदी साध्या पद्धतीने जरी केली असली तरी त्या सोहळ्याला आकर्षक सजावट केली होती.
एंगेजमेंटचे फोटो अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लवकर ते दोघे लग्नही करणार आहेत. राधा पाटील ही मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे. तर अभिषेक गुणाजी आपल्या आई वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमाऊ पाहत आहे. दिसायला अतिशय देखणा असलेल्या अभिषेकला फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे मात्र त्याने दिग्दर्शन क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षी त्याने ‘छल’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते ज्यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिवलमध्ये देखील विशेष नामांकन मिळाले होते. याशिवाय आपलं कर्जत जामखेड या भटकंती सिरीजचे दिग्दर्शनही त्याने केले. नुकतीच टीव्हीसी पाईपच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शनाची भूमिका त्याने पार पडली आहे, सुपर टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे तो भाग्य समजतो. आई वडिलांप्रमाणे अभिषेक गुणाजी हा देखील सिनेसृष्टीत आपलं नाव कमावेल ह्यात शंका नाही. अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील यांच्या एंगेजमेंट निमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.