आयत्या घरात घरोबा हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला सुप्राटीश चित्रपट. गोपूकाकांची अजरामर भूमिका विनोदसम्राट अशोक मामांनी साकारली होती, चित्रपटातील शेवटचा तो क्षण कोणीच विसरू शकणार नाही. अशोक सराफ छत्रीची दांडी हलवत बंगल्यातून जात असतात त्यावेळी सचिन त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो “बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात मोठा श्रीमंत चाललाय” हे वाक्य ऐकून प्रेक्षकांच्या डोळ्यात आपसूकच पाणी तरळते.
लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, सुप्रिया, सचिन पिळगांवकर, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी अशा दिग्ग्ज कलाकारांची कास्ट या चित्रपटाच्या दिमतीला होती. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नायिकेची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात काननची भूमिका साकारली होती राजेश्वरी सचदेव या अभिनेत्रीने. राजेश्वरी सचदेव ही थेटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते. मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या राजश्रीने IPTA जॉईन केले, अनेक नाटकांतून तीने अष्टपैलू भूमिका साकारल्या. आयत्या घरात घरोबा हा तिने साकारलेला पहिला वहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी सुरज का सांतवा घोडा चित्रपटात तिला काम दिले. सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून तिला संधी मिळाली.
हुल्ले हुल्लारे… हे तिनं गायलेलं गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. राजश्रीला खरी ओळख मिळाली ती झी टीव्ही वरील अंतक्षरीच्या शोमुळे. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर यांनी केले होते. याच शोमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला होता. अभिनेता वरूण वडोला याने अंतक्षरीच्या शोमध्ये सहभाग नोंदविला, तिथेच राजेश्वरीशी त्याची चांगली ओळख झाली. वरुण वडोला हा हिंदी मालिका अभिनेता म्हणून ओळखला जातो. ये है मुंबई मेरी जान, कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी धीर गंभीर भूमिका त्याने साकारल्या. २००४ साली राजेश्वरी वरूण सोबत विवाहबद्ध झाली. त्यांना देवाज्ञ नावाचा एकुलता एक मुलगा आहे. २०१८ साली राजेश्वरी पुन्हा एकदा मराठी सृष्टीकडे वळली. “एक सांगायचंय” हा आणखी एक मराठी चित्रपट तिने अभिनित केला. के के मेनन आणि राजेश्वरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते.