मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना प्रसिद्धी मिळते. पण या मिळालेल्या प्रसिद्धीचा कोणीतरी त्यांचा चाहता गैरवापर करत असतो. स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अर्जुन आणि सायलीच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे मालिकेचे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्जुनची भूमिका साकारणारा अमित भानुशाली याला या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते तयार झाले आहेत. पण त्याच्या अशाच एका चाहत्याने अमित भानुशालीच्या नावाचा वापर करून फसवणूक केली आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. अमित भानुशाली हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. मालिकेव्यतिरिक्त तो त्याच्या दररोजचे रुटीनही चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे अमितचा एक चांगला फॅनफॉलोअर्स तयार झालेला आहे. त्याच्या अशाच एका चाहत्याने त्याच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर एक फॅनक्लब बनवला आहे. या सोशल अकाउंटवर त्या चाहत्याने अमित भानुशालीचा फोटो वापरला, त्यामुळे फॅनक्लबचे अनेक चाहते तयार झाले आहेत. पण काही दिवसांपूर्वी अमितचा फोटो वापरून त्या व्यक्तीने स्वतःच्या बँक अकाउंटचे स्कॅनर शेअर करून फॅन्सकडून डोनेशन मागितले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चाहत्यांनी अमित वर विश्वास ठेवून काही पैसेही देऊ केले.
पण या प्रकरणात मी कुठेच नाही आणि तो पैसे मागणारा व्यक्ती मी नाहीच असा धक्कादायक खुलासा अमितने केल्याने अनेकजणांची फसवणूक झाली असल्याचे आता समोर आले आहे. पण ज्यांनी ज्यांनी अमित समजून त्या अकाउंटवर पैसे पाठवले त्यांचे पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून अमितने पुढाकार घेतला आहे. त्या फॅनक्लबशी अमितचे बोलणे झाले असून त्याला ते अकाउंटमधील सगळे डिटेल्स काढून टाकण्यास आणि अकाउंट पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात अनेकांनी अमित भानुशाली याचे नाव पाहून डोनेशन म्हणून काही रक्कम देऊ केली आहे. आपली फसवणूक झाली हे पाहून चाहते आता पैसे परत मिळण्यासाठी मागणी करू लागले आहेत. या प्रकरणामुळे अजून कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी अमितने चाहत्यांना सतर्क राहण्याचा एक सल्ला दिला आहे.
मी कुठल्याही संस्थेसाठी डोनेशन मागितले नाही असे अमितने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. दरम्यान याच मालिकेची नायिका जुई गडकरी ही देखील अशा काही सामाजिक संस्थेसाठी काम करत असते. अनेकदा ती अशा संस्थांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चाहत्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत असते. पण जुई चाहत्यांनी दिलेले डोनेशन योग्य ठिकाणी पोहोचवेल असा विश्वास तिच्या चाहत्यांना असतो. याच विचाराने त्या फॅनक्लबने अमित भानुशाली याच्या नावाचा गैरवापर करत स्वतःचा फायदा करून घेतला आहे. ऑनलाइन होणाऱ्या फसवणुकीपासून चाहत्यांनी दूर राहावे अशीच एक विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.