गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांनी डावललेलं पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांचा बडेजावपणा आणि तेच तेच वाढीव कथानक पाहून प्रेक्षकांनी अशा चित्रपटांकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळते. त्याचा परिणाम म्हणून की काय महाराष्ट्रात मात्र मराठी चित्रपटांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला आहे. नुकताच ३० जून रोजी केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघा एकच आठवडा झाला आहे मात्र या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल १२ कोटी ५० लाखांचा गल्ला जमवलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे बाईपण भारी देवाच्या टीमने सक्सेस पार्टी केली आहे. खरं तर हा चित्रपट सर्वसामान्य स्रियांचा आहे. त्यामुळे महिला वर्गाकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृह मालकांची ओरड असते की मराठी चित्रपट चांगले बनवत नाहीत. पण इथेतर चक्क आता पहाटेचे शो लावण्यास सुरुवात झाली आहे. अगदी सकाळीच म्हणजेच ६.१५ वाजता पहिला शो लावण्यात आल्याने चित्रपटाच्या कलाकारांना सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. बाईपण भारी देवा चित्रपटाच्या बाबतीत पहिल्यांदाच असे चित्र पाहायला मिळत आहे जिथे केवळ एक तासाच्या फरकाने शो लावले जात आहेत. महिला वर्ग घरातली सकाळची कामे आटोपून या शोला हजेरी लावत आहेत.
एकट्या दुकट्या महिलाच नाही तर अगदी ग्रुपच्या ग्रुप हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. चित्रपटाची तिकिटं मिळत नाहीत अशी ओरड याबाबतीत पाहायला मिळते. चित्रपट गृहात सकाळी सव्वा सहाला पहिला शो लागत असून रात्री पावणे बारा वाजता शेवटचा शो प्रदर्शित करण्यात येत आहे. ह्या नुसार चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणार असेच चित्र समोर येत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाची कलाकार मंडळी प्रमोशन निमित्त प्रेक्षकांच्या भेटी घेत होती. महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात येत होते. तेव्हा चित्रपटाची टीम महिलांना चित्रपट पाहण्यासाठी विनंती करत होती. त्याला आता प्रेक्षकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. आणि म्हणूनच आता चक्क पहाटेचे शो सुद्धा आयोजित करण्यात येऊ लागले आहेत.