झी मराठी वाहिनीवर लोकमान्य ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. नुकताच मालिकेने अनेक वर्षांचा लीप घेतलेला आहे. त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले पाहायला मिळणार आहेत. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. लोकमान्य टिळकांची मुलगी कृष्णा आता मोठी झाली आहे. ही भूमिका सान्वी जांबेकर निभावताना दिसत आहे. मालिकेतला सान्वीचा लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे येत्या काही भागात तिची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे.

सान्वी जांबेकर हिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. नामवंत वेध ऍक्टिंग अकॅडमीमधून ती गेले काही वर्षे अभिनयाचे धडे गिरवत होती. या माध्यमातून तिला प्रथमच मालिकेत झळकण्याची संधी मिळाली आहे. सान्वी ही प्रसिद्ध नृत्यांगना हर्षदा जांबेकर यांची मुलगी आहे. हर्षदा जांबेकर या शास्त्रीय नृत्यात निपुण आहेत. कथ्थकली या नावाने त्यांनी स्वतःचे डान्स क्लासेस सुरू केले आहेत. कथकलीच्या माध्यमातून युवा तरंग, अनाहत, नृत्यांजली अशा वेगवेगळ्या मंचावर हर्षदा यांनी आपली कला सादर केली आहे. दूरदर्शन वरील नावाजलेल्या नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख आहे. एवढेच नाही तर कोरिओग्राफर म्हणूनही त्या मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. वेध ऍक्टिंग अकॅडमी आणि कथ्थकली या संस्था एकत्रित येऊन मुलांना अभिनयाचे आणि नृत्याचे प्रशिक्षण देत असतात.

वेध ऍक्टिंग अकॅडमी मधून नृत्य आणि अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेऊन बरेचसे बालकलाकार मराठी सृष्टीत झळकले आहेत. नवख्या कलाकारांना अभिनय क्षेत्रात येण्याचं हे एक प्रभावी माध्यम बनलं आहे. अगदी यशोदा मालिका असो वा आता लोकमान्य मालिका, झी मराठी वाहिनीच्या बऱ्याचशा मालिकांमध्ये वेधचे विद्यार्थी नाव लौकिक मिळवत आहेत. सान्वीला सुद्धा बालपणापासूनच अभिनयाची आणि नृत्याची विशेष आवड आहे. त्यादृष्टीने तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. आता लोकमान्य मालिकेत तिची भूमिका कशी असणार याबाबद्दल तिलाही मोठी उत्सुकता आहे. या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी सान्वी जांबेकर हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.