झी मराठी वाहिनीने एवढ्या वर्षात अनेक दर्जेदार मालिका आणि रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. गाण्याचा रिऍलिटी शो असो किंवा फु बाई फु सारखा विनोदी शो यासर्वांवर प्रेक्षकांनी कायम भरभरून प्रेम दिलेलं आहे. मात्र आता नव्याने सुरू झालेल्या एका शोबद्दल प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. हा शो आहे अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते. खुपते तिथे गुप्ते या शोचे पहिले पर्व खूप गाजले होते. कलाकारांना आमंत्रित केल्यानंतर त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक घडामोडींबद्दल अवधूत गुप्ते खुलासा करत होता.
ही गुपितं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असत. त्यामुळे खुपते तिथे गुप्ते या शोचे नवे पर्व सुरू होतेय हे समजताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला होता. कलाकारांना जाणून घेण्याची संधी या शोमुळे मिळतेय हे समजताच प्रेक्षकांनी अवधूत गुप्तेचं जल्लोषात स्वागतही केलं. पहिला भाग राज ठाकरे यांच्यावर चित्रित करण्यात आला होता. त्या भागाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र या नंतर कुठल्याही कलाकाराला आमंत्रित न करता या शोने राजकारण्यांनाच प्राधान्य दिलेले पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात नारायण राणे येऊन गेले. त्यांनी संजय राऊत यांची अनेक गुपितं इथे उलगडली. मात्र त्यानंतर आता रविवारी होणाऱ्या भागात संजय राऊत यांनाच आमंत्रित केलेले पाहायला मिळत आहे.
नारायण राणे काय बोलले याचे व्हिडीओ संजय राऊत यांच्यासमोर दाखवले गेले. त्यामुळे या शोवर आता प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी दर्शवली आहे. गुप्ते आता राजकारण्यांमध्ये भांडणं लावायचे काम करतोय. यामुळे तो टीआरपी मिळतोय मात्र यातून काय साध्य होतंय? अशी ओरड सुरू झाली. राजकारणी लोकं अशीही मिडियासमोर येताच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. झी मराठी वाहिनीने देखील त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र इथेही जर असेच पाहायला मिळत असेल तर तो शो न पाहिलेलाच बरा अशी ओरड सुरू झाली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप पाहण्यात प्रेक्षकांना मुळीच रस नाही. त्यामुळे हा शो ताबडतोब बंद करावा अशी प्रेक्षकांकडून मागणी करण्यात येत आहे.