जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरील जीवनपटात आजवर अनेक कलाकारांनी भूमिका साकारली. नुकतेच प्रदर्शित झालेल्या तुकाराम चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी यांनी साकारलेली भूमिकाही सुंदर होती. मात्र विष्णुपंत पागनीस हे आजवरच्या भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. त्याचे कारणही तसेच खास आहे. तुकाराम महाराजांची भूमिका साकारल्यानंतर विष्णुपंत पागनीस खऱ्या आयुष्यातही तशाच वेशभूषेत तुकाराम महाराज बनूनच वावरत होते. सुरुवातीला नाटकातून स्त्री भूमिका साकारणारे विष्णुपंत तुकारामांची भूमिका कशी निभावतील याबद्दल दिग्दर्शकाला शंका होती. पण चित्रपट प्रदर्शित होऊन सुपरहिट झाला आणि ही भूमिका अजरामर झाली.
एवढेच नव्हे तर लोक आजही घरात तुकाराम महाराजांचा फोटो म्हणून त्यांचाच चित्रपटातील फोटो लावत आले आहेत. संत तुकाराम हा मराठी चित्रपट १९३६ साली प्रदर्शित झाला होता. तब्बल ४०० दिवस हाऊसफुल्ल चाललेला हा चित्रपट, त्यावेळी प्रभात फिल्म कंपनीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारा ठरला. त्याकाळी परदेशात प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट अशीही खास ओळख चित्रपटाने निर्माण केली होती. १९३७ सालच्या पाचव्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाने प्रदर्शित होण्याचा मान मिळवला होता. प्रभात फिल्म कंपनीचे विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अभिनेते विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची प्रमुख भूमिका साकारली होती.
चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका याच चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुपंत दामले यांचा मुलगा पंडित उर्फ वसंत दामले यांनी साकारली होती. चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीत, जे सध्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया FTII नावाने ओळखले जाणाऱ्या स्टुडिओत झाले होते. नदीत बुडवलेल्या तुकाराम गाथांचे चित्रीकरण तिथल्याच बनवलेल्या कृत्रिम तळ्यात करण्यात आले होते. तसेच वैकुंठ गमन याचेही भव्य दिव्य चित्रिकरण स्टुडिओत झाले. वैकुंठ गमन चित्रीकरण दरम्यान झालेल्या अपघाता विषयी सर्वजण जाणून आहेतच. याच चित्रपटाचा एक किस्सा असा सांगितला जातो की, विष्णुपंत पागनीस हे तुकाराम महाराजांच्या भूमिकेने खूपच प्रभावित झाले होते. तुकारामांच्या वेशभूषेत वावरताना त्यांना मान, सन्मान मोठी प्रतिष्ठा मिळू लागली होती.
चित्रपटात काम केल्याचे मानधन घेऊन जेव्हा निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी मानधन घेण्यास साफ नकार दिला होता. निर्मात्यांना वाटलं की चित्रपट गाजला म्हणून पागनीस यांना मानधन वाढवून पाहिजे असावे. म्हणून त्यात अगोदरच दुप्पट मानधन असल्याचे त्यांनी सांगितले. पण तेही मानधन घेण्यास विष्णुपंतांनी नकार दिला. अखेर याचे कारण सांगताना विष्णुपंत म्हणाले की, ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेने मला अजरामर केलं अशा भूमिकेसाठी मी मानधन घेणार नाही. संत तुकाराम चित्रपटानंतर विष्णूपंतांनी काही मोजक्या चित्रपटातून काम केले होते. असे हे प्रतिभावंत कलाकार विष्णुपंत पागनीस यांनी ३ ऑक्टोबर १९४३ रोजी अखेरचा श्वास घेतला.