चंदेरी दुनियेत काम करत असताना कलाकारांना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. या सर्वातून तुम्ही आपले अस्तित्व कसे सिद्ध करता यावर त्या कलाकाराची कसब ओळखली जाते. नाळ चित्रपटातून एकही संवाद वाट्याला न आलेल्या दिप्तीलाही या सृष्टीने अनेक चांगले वाईट अनुभव दिले. मात्र यातूनही स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याला मी मुळीच घाबरत नाही असे ती म्हणते. काम मिळवण्यासाठी मला तुमच्याकडे काम करण्याची ईच्छा आहे असं म्हणावं लागतं. त्यातून तुम्हाला काहीना काही तरी काम मिळत राहतं. या इंडस्ट्रीने आपल्याला अलगद बाजूला केलं आपल्याला डावलण्यात आलं.
असे आरोप करण्यापेक्षा दीप्ती म्हणते की माझ्याकडे चांगल्या भूमिका येणं बंद झालं. दीप्ती देवी ही मराठी मालिका, चित्रपट अभिनेत्री आहे. नाळ चित्रपटातील एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती. कंडिशन्स अप्लाय अटी लागू, अंतरपाट, पेज ४, मंत्र, शेवंती, घर बंदूक बिरयानी अशा चित्रपटातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच दिप्तीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून तिने मराठी सृष्टीबद्दल काही वक्तव्य केलेली आहेत. या इंडस्ट्रीत एकतेचा अभाव आहे असे ती म्हणते. बऱ्याचदा कास्टिंग काऊचबद्दल बोललं जातं, पण त्या गोष्टीला नकार द्यायला शिकलं पाहिजे. जर सगळ्यांची एकी असेल तरच हे असे प्रकार घडणार नाहीत असे ती ठाम म्हणते. मराठी इंडस्ट्रीत अशा गोष्टी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात.
मराठी इंडस्ट्रीत काही ठराविक ग्रुप बनले आहेत. मी नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटातून काम केले त्यामुळे मी आटपाटच्या ग्रुपशी जोडली गेलेली आहे, असे म्हटल तर वावगं ठरणार नाही. कारण मला कित्येकदा चांगल्या भूमिकेपासून वंचित राहावं लागलं आहे. अनेकदा माझ्याकडे चांगल्या भूमिका येणे बंद झाले. एखादी गोष्ट मला जेव्हा पटत नाही त्यावर मी व्यक्त होत असते. पण काम जाईल म्हणून त्यावर परखड मत मांडणारे खूप कमी लोक आहेत. आज मी लीड रोल करते म्हणून माझ्या आजूबाजूला पाच लोकं आहेत. पण ज्या क्षणी माझ्याकडून हे काम जाईल तेव्हा माझ्यासोबत असे किती लोक असतील? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर दीप्ती भावुक होते आणि तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावताना दिसतात.