ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बालपणापासूनच रंगभूमीवर पाऊल टाकले होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७५ सालच्या पांडू हवालदार चित्रपटातील सखारामच्या भूमिकेने. ५० वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी मराठी सृष्टीत केवळ विनोदी भूमिकाच नाही तर, अगदी खलनायकाची भूमिकाही रंगवलेल्या पाहायला मिळतात. पण अभिनय क्षेत्रातला त्यांचा हा प्रवास यशस्वी ठरण्याअगोदर त्यांनी दहा वर्षे बँकेची नोकरी केली होती. बँकेची नोकरी करत असताना बँकेत कमी आणि नाटकाच्या दौऱ्यावर जास्त असायचे. याची आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. घरखर्च आणि अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते.
नाटकातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने घरखर्चाला हातभार लागावा म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली होती. अशोक सराफ यांना त्यावेळी बँकेत काम केल्यानंतर २३५ रुपये महिन्याला पगार मिळायचा. या पगारातून ते महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ बसवायचे. २३५ रुपये पगारातून ते घर खर्चासाठी २०० रुपये द्यायचे. उरलेले ३५ रुपये ते स्वतःसाठी ठेवायचे. या ३५ रुपयातून चित्रपट पाहण्याची आवड जोपासायचे. राहिलेल्या पैशातूनच एक वेळचे जेवण असा महिन्याचा खर्च ते भागवायचे. बँकेच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यावेळी १० पैशात पाव आणि १५ पैशात पातळ भाजी मिळायची. एवढ्या पैशातच ते आपलं दुपारचं जेवण करायचे. हा होता त्यांच्या कायमचा ठरलेला दुपारच्या जेवणाचा खर्च. त्याकाळी नाटकातून काम केल्यानंतर कलाकारांना तुटपुंजे मानधन मिळत होते.
नाटक ही आपली आवड असली तरी पोटापाण्यासाठी त्यांना नोकरी करावी लागायची. पण हळूहळू या क्षेत्रात अशोक सराफ यांचा जम बसत गेला. दरम्यान दहा वर्षाच्या बँकेच्या नोकरीला त्यांनी कायमचा रामराम ठोकला. प्रत्येक कलाकाराने आयुष्यातला असा कठीण काळ अनुभवलेला असतो. अभिनय क्षेत्रात सहजासहजी यश मिळणे ही खूप गौण गोष्ट मानली जाते. शंभरातून अगदी एखादाच हिरा चमकतो असे म्हटले जाते. या अनुभवावरून अशोक सराफ मामांनाही आयुष्यातील खडतर स्ट्रगल चुकलेला नव्हता हे समजते. त्याचमुळे आजही ते आपले पाय जमिनीवरच ठेवून आहेत. नवख्या कलाकारांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं यामुळे ते सर्वच कलाकारांचे आवडते झाले आहेत.