दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ सावरण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगळ्या आणि दमदार चित्रपटांमधून दादा कोंडके यांना अमाप यश सुद्धा मिळाले होते. सोंगाड्या, पांडू हवालदार, पळवा पळवी, मुका घ्या मुका अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृतीतून त्यांनी चित्रपटगृह बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. अशातच त्यांनी भोर येथील इंगवली या गावी स्वतःचे स्टुडिओ उभारले होते. त्याकाळी हे स्टुडिओ चित्रपटाच्या शूटिंगसाठी खुले करण्यात आले होते. इंगवली गावच्या मातीत अनेक चांगल्या कलाकृती घडल्या होत्या. मात्र दादांच्या पश्चात हा स्टुडिओ बंद पडलेला पाहायला मिळाला.
आता याच मातीत पुन्हा एकदा कलाकारांची मांदियाळी जमायला सुरुवात झाली आहे. दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी नुकत्याच आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. दादांच्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी वितरक म्हणून काम केले होते. त्यांनीच १९९१ सालच्या माहेरची साडी या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटानंतर लेक असावी तर अशी या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताची मेढ दादा कोंडके यांच्या स्टुडिओत रोवलेली आहे. ज्योती पिक्चर्स प्रस्तुत लेक असावी तर अशी चित्रपटाचे उदघाटन शनिवारी १५ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ पार पडला. माहेरची साडी चित्रपटानंतर विजय कोंडके यांनी तब्बल ३१ वर्षानंतर या क्षेत्रात पुनरागमन केलेले आहे.
लेक असावी तर अशी या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अभिनेते यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्ता हनमघर, गार्गी दातार हे कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या निमित्ताने सुपरस्टार दादा कोंडके यांचा स्टुडिओ पुन्हा एकदा रोल, साउंड आणि ऍक्शनच्या आवाजात दुमदुमला आहे. दादांचा हा स्टुडिओ गेल्या ३० वर्षांपासून बंद पडला होता. त्याला पुतणे विजय कोंडके यांनी पुनरुज्जीवन देण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यामुळे भविष्यात भोर, इंगवलीच्या या मातीत आणखी सुंदर कलाकृती घडतील अशी आशा प्रेक्षकांना आहे.