हिंदी बिग बॉस सिजन १६ चा स्पर्धक आणि मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हिंदी बिग बॉसनंतर शिवकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आले आहेत. नुकतीच त्याने ३० लाख रुपयांची नवीन कार घेतली होती. त्यानंतर शिवने स्वतःच्या नावाने रेस्टॉरंट देखील उघडले. ठाकरे चाय या नावाने त्याने व्यवसाय सुरू केला. हिंदी बिग बॉसच्या यशस्वी कारकिर्दीनंतर नवीन काळ्या रंगाची हॅरियर त्याने कार खरेदी केली होती. याअगोदर त्याने दोन सेकंड हॅन्ड गाड्या वापरल्या होत्या. आपल्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात आहे. आता या गाडीची पूजा आईच्या हातून व्हावी म्हणून तो अमरावतीला जाणार असे त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
शिव त्याच्या अमरावती येथील घरी नुकताच गेला असता त्याच्या आईकडून गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवची बहिणसुद्धा तिथे उपस्थित होती. आपल्या आईवडिलांना, बहिणीला आणि भाचीला नव्या कोऱ्या गाडीत बसवून त्यांना फिरवून आणण्याचा प्लॅन केला होता. हा सुखद क्षण शिवने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. नवी कोरी गाडी घेतल्यानंतर शिवने त्याच्या नवीन व्यवसायाची घोषणा केली होती. गेल्या काही वर्षांपासून केलेल्या मेहनतीचे कुठेतरी फळ मिळत आहे असे त्याने व्यवसायाच्या उद्घाटनावेळी म्हटले होते. हा चहाचा ब्रँड पुढे नेण्यासाठी आणि नवीन ठिकाणे उघडण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा त्याचा मानस आहे. या नवीन व्यवसायाबद्दल त्याच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती.
हे सांगताना तो म्हणतो की, मी माझ्या कुटुंबाला या नवीन उपक्रमाची माहिती दिली. परंतु त्यांनी योजना पूर्णपणे समजून घेतलेली नाही. मात्र, अमरावतीला गेल्यावर तो त्यांना समजावून सांगेल. पण ते खूप आनंदी आहेत, असा खुलासा त्याने केला. शिवला या व्यवसायाच्या फ्रँचायझी उघडण्याची इच्छा आहे. मुंबई, पुण्यात आणि नंतर अमरावती या गावी रेस्टॉरंट सुरू करण्याचा त्याचा विचार आहे. शिवाय, त्याने सांगितले की त्याच्या पालकांना त्याचा खूप अभिमान आहे, परंतु त्यांची एक तक्रार आहे तो त्यांना भेटू शकत नाही. त्याची आई त्याच्याशी फोन कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्सद्वारे बोलते. परंतु त्याचे वडील काहीच बोलत नाहीत कारण तो प्रत्येक वेळी कॉल करतो तेव्हा त्याची आईच दरवेळी फोन उचलते, असे शिव म्हणतो.