Breaking News
Home / जरा हटके / प्रसिद्धी मिळवूनही अखेरच्या दिवसात अनाथाश्रमात राहिलेली नायिका
shanta hublikar
shanta hublikar

प्रसिद्धी मिळवूनही अखेरच्या दिवसात अनाथाश्रमात राहिलेली नायिका

आज १४ एप्रिल प्रसिद्ध अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्मदिवस. बालपण अतिशय कष्टात गेलेल्या या अभिनेत्रीने पतीच्या कर्जबाजारीपणामुळे कामं केली. आपल्या अखेरच्या दिवसात त्यांना स्वतःचे घर असूनही आश्रमात राहावे लागले, हीच मोठी शोकांतिका होती. १४ एप्रिल १९१४ रोजी कर्नाटकातील हुबळी शहराजवळील अदरगुंजी गावात शांता हुबळीकर यांचा जन्म झाला. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्याने मोठ्या बहिणीसोबत आजीकडे राहायला गेल्या. पण आजीला आर्थिक खर्च पेलवेना म्हणून त्यांनी शांताला एका सधन नातेवाईकांकडे दत्तक म्हणून दिले. इथेच शांताबाईंचे शालेय शिक्षण सुरू झाले. हुबळीत शास्त्रीय गायक अब्दुल करीम खाँ यांचा मुक्काम वाढला.

shanta hublikar
shanta hublikar

शांताबाईंनी तीन वर्षे त्यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले. त्यांना दत्तक घेतलेल्या आईने एका वयस्कर माणसाशी लग्न जुळवले. त्या लग्नाला नकार म्हणून त्यांनी हे घर सोडले. १९३० साली वयाच्या १६ व्या वर्षी गुब्बी या नाटक कंपनीत दाखल झाल्या. पगार म्हणून त्यांना ४० रुपये मिळू लागले. बाबुराव पेंढारकर यांच्या कालियामर्दन चित्रपटातून त्यांचे मोठया पडद्यावर पदार्पण झाले. पुढे १९३९ साली प्रभातच्या व्ही शांताराम यांच्या माणूस चित्रपटाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. मैना या देह व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका त्यांनी साकारली होती. चित्रपटातील ‘आता कशाला उद्याची बात’, हे गाणं त्यानीच गायलेलं होतं. डोक्यावर फेटा आणि हातात काठी असलेला त्यांचा आब पाहून त्यावेळी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

shanta hublikar mahesh tilekar sir
shanta hublikar mahesh tilekar sir

या चित्रपटावरून आदमी हा हिंदी चित्रपट सुद्धा खूप लोकप्रियता मिळवताना दिसला होता. याच वर्षी पुण्याच्या डेक्कन एम्पोरियमचे मालक बापूसाहेब गीते यांच्याशी त्यांनी आळंदीत साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नवऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे लग्नानंतरही चित्रपटातून काम करणे त्यांनी सोडले नाही. देणेकरांची देणी फेडण्यासाठी चित्रपटांचे दौरे करू लागल्या. दरम्यान प्रदीप या त्यांच्या मुलाच्या नावाने त्यांनी मुंबईत बंगला बांधला. कालांतराने शांता बाईंना नायिकेच्या भूमिका मिळणे कठीण होऊ लागले. तेव्हा त्यांनी १९५८ सालच्या सौभाग्यवती भव चित्रपटातून चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर गायनाची कला जोपासत त्या नाट्यगीत, भावगीतांचे कार्यक्रम करू लागल्या.

मात्र पैशांच्या नियोजनाअभावी हे कार्यक्रम बंद पडले. १९७७ साली नवऱ्याचे निधन झाले. मुलाचे लग्न झाले, त्यानंतर आपल्याच घरात त्या परक्या झाल्या. झगमगत्या दुनियेपासून दूर जाऊन त्या वसईच्या श्रद्धानंद अनाथाश्रमात राहू लागल्या. एवढा मानसन्मान प्रसिद्धी मिळेवलेली नायिका आज आश्रमाचा आसरा घेतीये. हे पाहून १९८८ साली माधव गडकरी यांनी त्यांच्यावर लेख लिहिला. त्यानंतर शांताबाई पुन्हा लोकांच्या संपर्कात येऊ लागल्या. दरम्यान त्यांना निवृत्तीवेतन देण्यात आले. त्यानंतरचे आयुष्य त्यांनी पुण्यातील महिला मंडळाच्या आश्रमात व्यतीत केले. १५ जुलै १९९२ रोजी शांताबाईंनी या जगाचा निरोप घेतला.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.