आज ५ एप्रिल दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांचा स्मृतिदिन. शांता जोग या मूळच्या नाशिकच्या. २ मार्च १९२५ रोजी कलाकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शांता खरे हे त्यांचे माहेरचे नाव. बालपणापासून त्या नाटकातून काम करायच्या. त्यांचे वडील केशवराव खरे हे नाशिक येथे नाट्यसृष्टीत कार्यरत होते. केशवरावांची मुलगी म्हणून शांता खरे ह्यांना ओळखले जायचे. छापील संसार या नाटकाचे त्यांनी यशस्वीपणे तीन प्रयोग केले होते, त्याकाळी हा एक विक्रमच असायचा. वयाच्या १६ व्या वर्षीच जोग घराण्यात त्यांचे लग्न झाले. मात्र लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले. यात त्यांना नवऱ्याची भक्कम साथ मिळाली. पुढे त्या पुण्यात आल्या.
फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकातून कामं केली. यातूनच त्यांना भालजी पेंढारकर यांच्या सासुरवास चित्रपटात महत्वाची भूमिका मिळाली. नाटक, चित्रपटातून विविधांगी भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नटसम्राट नाटकात त्यांनी बेलवलकर यांच्या पत्नी कावेरीची भूमिका गाजवली होती. तारा मंडल, उसना नवरा, तुझे आहे तुजपाशी, भावबंधन, अंगाई, सुंदर मी होणार, आराम हराम आहे, वऱ्हाडी आणि वाजंत्री अशा चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या. मात्र रंगभूमीवर त्या जास्त रुळलेल्या पाहायला मिळाल्या. ५ एप्रिल १९८० रोजी मंतरलेली चैतरवेल नाटकाचे प्रयोग आटोपून कलाकार मंडळी मुंबईच्या दिशेने निघाली होती.
नाटकासाठी लागणारे सर्व साहित्य आणि प्रवासात लागणारे इंधन अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बसमध्ये ठेवल्या जात होत्या. सर्व कलाकार मंडळी अर्धवट झोपेत असतानाच गाडीने पेट घेतला. यातच शांता जोग आणि जयराम हार्डीकर यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी नाट्य चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली अशा भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. अभिनेते अनंत जोग हे शांता जोग यांचे सुपुत्र. अनंत जोग हे बालपणापासूनच नाटकातून काम करत पण आपल्या मुलाला अभिनय येत नाही. तू वेगळा पर्याय शोध असा थेट सल्लाच शांता जोग यांनी दिला होता. तेव्हा आपण याच विचाराने त्यांना झपाटून सोडले आणि त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हिंदी मराठी चित्रपटातून अनंत जोग यांनी खलनायकाची भूमिका चोख बजावलेली पाहायला मिळाली.
अनंत जोग यांच्या पत्नी उज्वला जोग याही उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. नुकतेच त्यांनी तू तेव्हा तशी मालिकेत नायकाच्या मावशीची भूमिका गाजवली होती. तर त्यांची मुलगी क्षिती जोग आणि जावई हेमंत ढोमे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तर दिग्दर्शन क्षेत्रातही हेमंत झिम्मा, सनी, बघतोस काय मुजरा कर, सातारचा सलमान, चोरीचा मामला, ऑनलाईन बिनलाईन. बस स्टॉप येरे येरे पैसा, मंगलअष्टक वन्स मोर, क्षणभर विश्रांती या चित्रपटांच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी करताना दिसत आहे.