सचिन पिळगावकर पत्नी सुप्रिया सोबत काळी राणी हे नाटक पाहायला गेले होते. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात गिरीश ओक, मनवा नाईक, हरीश दुधाडे अशी कलाकार मंडळी महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. नव्याने सुरू झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांना देखील हे नाटक पाहण्याची इच्छा झाली. नाटक पाहिल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी गिरीश ओक यांच्या अभिनयाचे तसेच गाण्याचे कौतुक केले. सोबतच त्यांचा आवडता अभिनेता म्हणजे हरीश दुधाडे याचा अभिनय तर उत्तम होता ही कौतुकाची थाप त्यांनी हरीश दुधाडेला दिली आहे.
हरिश दुधाडे हा सचिन पिळगावकर यांचा आवडता अभिनेता आहे असे त्यांनी म्हटले आहे. गिरीश ओक यांनी नाटकानिमित्त सचिन पिळगावकर यांच्याकडून दोन शेर मागवले होते. सचिन पिळगावकर यांचा उर्दू भाषेचा चांगला अभ्यास आहे. नाटक पाहिल्यानंतर सचिन पिळगावकर यावर प्रतिक्रिया देताना म्हणतात की, ‘काळी राणी’ नावाचं नाटक काल मी आणि सुप्रियानं पाहिलं. रत्नाकर मतकरींचे दर्जेदार लेखन, आमचा मित्र विजय केंकरे याचं अनुभवी दिग्दर्शन. देखणं निर्मिती मूल्य, मंगल केंकरे यांच सुरेख costume designing, प्रभावी प्रकाश योजना, lights operators अचूक. ‘कलाकार’ गिरीश ओक नी अप्रतिम किरदार निभवलय, तो या character मध्ये पोहतो. मनवा नईकनी फारशी नाटकं केली नसली तरी तिची stage वरची command आकर्षक होती.
गिरीश सारख्या मातब्बर कलाकाराला टक्कर देणं सोपं नाही. माझा आवडता कलाकार हरीष दुधाडे याचा छान अभिनय पाहून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली. गिरीश इतका सुंदर गातो हे प्रथम कळलं, त्याने गात राहिले पाहिजे. एकूण आनंदी अनुभव आम्हा दोघांनीही लाभला, ज्यांनी हे नाटक पाहिलं नसेल त्यांनी अवश्य पहावं. अनेक शुभेच्छा, अनेक शुभाशीर्वाद. दरम्यान आपल्या नाटकाला सचिन आणि सुप्रिया ही लाडकी जोडी आल्याने गिरीश ओक देखील भारावून गेले. या नाटकासंदर्भात त्यांनी एक आठवण सांगताना म्हटले आहे की, ज्यांनी आपल्या नाटकाला यावं असं वाटतं त्यापैकी सचीनजी आणि सुप्रीयाजी पिळगावकर ते दोघं स्वतःहून माझ्या नाटकाला आले. त्यांना माझं काळी राणी हे नाटक खूप आवडलं.
सचीनजींचा उर्दू आणि शायरीचा अभ्यास,व्यासंग तगडा आहे ते स्वतः “शफक” ह्या नावानी शायरीही करतात. माझ्या “काळी राणी” ह्या नाटकात माझ्या भूमिकेसाठी मला काही खास शेर हवे होते. मी त्यांना तसा फोन केल्यावर लगेच उलट टपाली म्हणतात तसे त्यांनी ते मला पाठवले. त्यातले दोन मी आता नाटकात वापरतो, त्याला हमखास टाळी येते. मजनू नझर आती है, लैला नझर आता है, वहशत में हर नक्श, उलटा नजर आता है. आणि “जगह मेरी रानीकी इस कलेजे के भीतर है चमक मेरे महोब्बत की इस हीरे से कहीं बढकर है. असे ते दोन शेर. ते समोर बसलेले असताना नाटकात ते म्हणताना काय मजा आली राव, बास आणखीन काय पाहिजे.