झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं मालिकेत अश्विनी सारख्या एका सामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मालिका महिला वर्गाने चांगलीच उचलून धरलेली पाहायला मिळाली. नवऱ्याचा विरोध पत्करून, सासूची मनधरणी करून अश्विनी हळूहळू स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना दिसली. बऱ्याचदा तिला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले. घर खर्चाला हातभार लागावा म्हणून अश्विनी पार्लरचा व्यवसाय सुरू करते. त्यानंतर या क्षेत्रात स्थिरावत असतानाच ती सौंदर्य स्पर्धेत भाग घेते. ह्या गोष्टीला नवऱ्याचा आणि सासूचा विरोध असतानाही ती धाडसाचा निर्णय घेते. मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत आल्यानंतर तिची नणंद देखील अडचणी निर्माण करताना दिसते.
एकेक टप्प्यावर योग्य पाऊल उचलत अश्विनी आता फायनलमध्ये जाऊन पोहोचली आहे. परीक्षकांनी विचारलेल्या फेमिनिझम म्हणजे काय? या प्रश्नावर तिचे उत्तर सगळ्यांना विचार करायला लावणारे ठरले आहे. प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी तिच्या नवऱ्याची, घरच्यांची साथ मिळायला हवी. मात्र जिथे महिला वर्गच अशा महिलांचे पाऊल मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी फेमिनिजमचा अर्थ प्रकर्षाने जाणवतो. महिलांची बरोबरी नेहमी पुरुषांशी केली जाते, मात्र एक महिला म्हणून तुम्ही जर एका महिलेलाच विरोध करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. अश्विनी इथे एक उदाहरण देताना म्हणते की, सुरूवातीला माझ्या सासूने देखील अशा गोष्टीत सहभाग दर्शवण्यावर आक्षेप घेतला होता. सोसायटीच्या एका कार्यक्रमात त्यांनी मला सहभागी होण्यास विरोध केला. मात्र आज माझी सासू माझ्या बाजूने उभी आहे.
तिला माहिती आहे साडीवर कुंकू लावत नाहीत, मात्र त्या साडीवर शोभेल अशी नाजूक टिकली त्यांनी माझ्यासाठी शोधून आणली. मला परीक्षकांना फेमिनिजम म्हणजे काय याचे हे उदाहरण द्यायचे आहे. अश्विनीच्या या उत्तरानंतर महिला प्रेक्षकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. या मुद्द्यावर महिला वर्ग आता भरभरून बोलायला सुरुवात करत आहे. स्रियांना घरातून पाठिंबा मिळत नाही म्हणूनच त्या मागे राहतात. सासू सासऱ्यांकडून, नवऱ्याकडून विरोध होत असल्याने ती पाऊल उचलू शकत नाही. ही विचारसरणी कुठेतरी पुसली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र काही अंशी आता सासू सुद्धा आपल्या सुनेची बाजू मांडताना पाहायला मिळतात. हे बदल घडून आले तरच सुखी संसाराची समीकरणे जुळून येऊ शकतात.