आज २७ मार्च, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस. सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ. वडिलांचे निधन झाले तेव्हा नलिनी यांनी नृत्याच्या कलेवर चित्रपट सृष्टीत स्थान मिळवले. सुरुवातीला नृत्याच्या समूहातून त्यांना काम मिळाले. त्यानंतर आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. सीमा हेच नाव त्यांनी पुढे आत्मसात केले. ग्यानबा तुकाराम चित्रपटात त्या रमेश देव यांच्या सहनायिका बनल्या, यानंतर या जोडीने अनेक चित्रपटातून एकत्रित काम केले. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रमेश देव यांनी प्रपोज केल्यानंतर हा चित्रपटाचाच एक भाग असावा असा समज सीमा देव यांनी केला होता. त्यानंतर दोघेही मोठ्या थाटात कोल्हापूर येथे विवाहबद्ध झाले.
रमेश देव यांच्याशी लग्न झाल्यानंतर अभिनय आणि अजिंक्य ही दोन अपत्ये त्यांना झाली. दोघांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळत असताना अभिनय क्षेत्रातील ब्रेकनंतर पुन्हा एकदा त्या चित्रपट सृष्टीकडे वळल्या. यादरम्यान सहाय्यक, चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका त्यांनी निभावल्या. सुवासिनी, यंदा कर्तव्य आहे, वरदक्षिणा, जगाच्या पाठीवर, सर्जा, जुनं ते सोनं, दादा, आनंद, जवानी की कहाणी. मोलकरीण, यही है जिंदगी अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून सीमा देव यांनी त्यांच्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली. रमेश देव सीमा देव यांना नेहमी काही ना काही भेटवस्तू देत असत. त्यावेळी त्या भेटवस्तू घ्यायला नकार देत असत. एकदा मौल्यवान हीऱ्यांच्या बांगड्या भेट म्हणून आणल्या असताना सीमा देव यांनी त्या घेण्यास नकार दिला.
तेव्हा रमेश देव म्हणाले होते की, काय माहीत मी उद्या तुझ्यासोबत असेन की नाही त्यामुळे मला आज हे तुझ्यासाठी घेऊ दे. तेव्हापासून सीमा देव त्यांची प्रत्येक भेटवस्तु स्वीकारू लागल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराशी तोंड देत आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला असल्याने त्या रमेश देव यांनाही ओळखत नव्हत्या. कधी चुकून त्या रमेश अशी हाक मारायच्या तेव्हा कुठेतरी आशा पल्लवित व्हायच्या असे रमेश देव आपल्या अखेरच्या दिवसात म्हणायचे. ही खंत ते अनेकदा बोलून दाखवायचे मात्र सीमा देव यांना काहीच आठवत नसायचे. आजही त्या या आजाराने ग्रासलेल्या आहेत. अभिनयातील देव आज आपल्यात नाही पण यांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुलं आणि सुना सीमा देव यांची व्यवस्थित काळजी घेत आहेत.