दोस्त असावा तर असा, तूच माझी राणी, नणंद भावजय, जावई विकत घेणे आहे. भन्नाट भानू अशा मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारणारे अभीनेते रविराज यांचा काल स्मृतिदिन साजरा करण्यात आला. देखणा, रुबाबदार आणि हसरा चेहरा असलेला हा नायक अमराठी असेल याचा कोणीही विचार केला नसेल. ७० ते ८० च्या दशकात रविराज यांनी मराठी चित्रपटांसह हिंदी आणि गुजराथी चित्रपटातून अभिनय साकारला होता. त्यांनी हिंदी मालिकांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. रवीराज यांचे खरे नाव होते रविंद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटात येण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलले आणि तेच पुढे आत्मसात केले. मंगलोर येथे त्यांचा जन्म झाला होता.
वडील नोकरीनिमित्त मुंबईला आले तेव्हा ते कुटुंबासह मुंबईतच स्थायिक झाले. रविराज यांनी रुपारेल कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले होते. लहानपणी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांना अभिनयाची गोडी निर्माण झाली. मात्र वडिलांचा कला क्षेत्रात येण्याला साफ विरोध होता. म्हणून प्रॉडक्शन केमिस्ट पदावर त्यांनी एका कंपनीत नोकरी केली. पण नंतर कंपनी बंगलोरला गेल्याने आणि वाढीव पगार देणार नसल्याने नोकरीला कायमचा रामराम ठोकला. रविराज यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. एके दिवशी घरासमोरील गटार तुंबल्याने स्थानिक नगरसेवक प्रभाकर निकलणकर यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. त्यावेळी निकलणकर चित्रपटाचे निर्माते म्हणून काम करत होते. त्यांनीच रविराज यांना १९७५ सालच्या शुरा मी वंदिले चित्रपटातून पहिल्यांदा अभिनयाची संधी देऊ केली.
रविराज यांनी या संधीनंतर मागे वळून पाहिलेच नाही. मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांच्या वाट्याला महत्वाच्या भूमिका येत गेल्या. आहट, खट्टा मिठा, एक चिठ्ठी प्यार भरी असे हिंदी चित्रपट त्यांनी केले. दरम्यान उषा यांच्याशी त्यांनी विवाह केला. मुलगी पुजश्री आणि मुलगा प्रितेश अशी दोन अपत्ये त्यांना झाली. पुढे रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत त्यांनी गर्ग ऋषींची भूमिका साकारली होती. काही मोजक्या गुजराती चित्रपटात ते झळकले होते. इतकी वर्षे चित्रपटातून, मालिकेतून काम करूनही ते शेवटपर्यंत मात्र भाड्याच्याच घरात राहिले. कलाकार कोट्यातून घर मिळावे म्हणून अनेक वर्षे ते शासनाकडे प्रयत्न करत होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना यश मिळालेच नाही. १८ मार्च २०२० रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी विलेपार्ले येथील राहत्या घरी रविराज यांनी अखेरचा श्वास घेतला होता.