चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे हा मूळचा पुसदचा. विदर्भातील कलाकार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तो या सृष्टीत स्वतःची ओळख जपताना पाहायला मिळाला आहे. अंकुर वाढवे हा नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. वेगवेगळ्या विषयांवर बोलून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्याने आपल्या पत्नीला उद्देशून एक भावनिक पोस्ट लिहिली होती. प्रत्येकीच्या आयुष्यातला राजकुमार हा ठरलेला असतो. लग्न जुळवण्याच्या वेळी अंकुरला एका मुलीने नकार दिला होता. त्यावेळी आपण कधी लग्नच करायचं नाही असा विचार मनाशी पक्का केला होता.
मात्र मामाच्या मुलीने होकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी स्वतःबद्दल अगदी मनमोकळेपणाने सर्व बोलून टाकले होते. त्याची ही गोष्ट त्यावेळी खुपच चर्चेत आली होती. यानंतर आता अंकुरने आणखी एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अंकुर म्हणतो की, काल लवकर झोपल्यामुळे कदाचीत आज पहाटे ४ वाजता जाग आली. नंतर प्रयत्न केला पण झोप लागत नव्हती, म्हटल काही तरी वाचावं. सकाळचं वाचन हा माझा स्वभाव नाही. उठलो आणि माझ्या छोट्याश्या पुस्तकाच्या संचायातून पुस्तकं शोधत होतो. तेवढ्यात मला वैभव भिवरकर दादाचं “करुणेचे कॉपीराइट” दिसलं. पुस्तक भेट दिलं होतं तेंव्हा बोललो होतो वाचून कळवतो, म्हटलं ही योग्य वेळ आहे. मलपृष्टवरची कविता वाचून आत काय असणार याची खात्री आली.
माँ च्या मजबूत खांद्यावर सृष्टीच्या सृजनत्वाची धुरा आहे. मायशिवाय जन्म घेता येत नाही. मातीशिवाय अंकुरता येत नाही आणि माणुसकीशिवाय जगता येत नाही. इतकं साधं सोप्पं आयुष्याचं गणित आहे. पण कट्टरता, जात, धर्म, बेगडी अस्मिता जोपासण्याच्या नादात आपण माणूस म्हणून जगणंच हरवून बसतो. कविता माणसाची असावी माणसावर रचलेली नसावी असं मला नेहमी वाटते. त्या वाटण्याला तेच खरं आहे हे वैभवदा कवितासंग्रहातून मला पटवून दिल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या कविता वाचून पुस्तकाच्या थाप्पीमध्ये सगळ्यात खाली गेलेली माझ्या कवितेची डायरी परत बाहेर काढली. सरते शेवटी तुझ्याच मनोगतातील एक भाग जो मला आवडला. आपण तोपर्यंत चालत राहवं, जोपर्यंत षड्रपू कोरडे होऊन आपल्यातल्या डेबूचा गाडगेबाबा होत नाही.