ख्वाडा, बबन या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी रौंदळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आज ३ मार्च २०२३ रोजी रौंदळ चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसला आहे. चित्रपटाला ग्रामीण भाषेचा बाज असल्याने महाराष्ट्रातील खेडोपाडी याला पसंती दर्शवली जात आहे. भाऊसाहेब शिंदे सारखा गावरान बाज असलेला रांगडा कलावंत मराठी सृष्टीला लाभला. राजकारणी लोकांमुळे एका शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन पडोळ यांनी केलं आहे. तर निर्मिती बाळासाहेब शिंदे, डॉ पुरुषोत्तम भापकर, भाऊ शिंदे यांनी केली आहे. भाऊसाहेब शिंदे चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका साकारत आहे. त्यांच्या सोबत चित्रपटात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नेहा शशिकांत सोनवणे ही नायिका स्क्रीन शेअर करत आहे. कळवण तालुक्यातील जुनीबेज गावातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात नेहाचा जन्म झाला. स्थानिक शाळेतून शिकत असताना १२ वी पर्यंतचे शिक्षण तिने मराठी माध्यमातून केले. नेहा शालेय शिक्षणात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. बारावीनंतर तिने नाशिकला कंप्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना नेहाला थेट चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली.
नेहाला शेतीच्या कामाचा अनुभव होता. याच ज्ञानाच्या जोरावर तिने ही भूमिका मिळवली. आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे कळवणच्या कन्येचा राज्यभर डंका अशी प्रसिद्धी तिला मिळू लागली आहे. रौंदळ चित्रपटात भाऊसाहेब आणि नेहासोबत आणखी बरेच नवीन चेहरे झळकताना दिसत आहेत. यशराज डिम्बळे, सुरेखा डिम्बळे, शिवराज वालवेकर, संजय लकडे, गणेश देशमुख, सागर लोखंडे अशा कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटानिमित्त भाऊसाहेब शिंदे यांनी पुण्यातील विमाननगर येथील फिनिक्स मॉल येथील चित्रपट गृहात हजेरी लावली. त्यावेळी चित्रपटाच्या नायकाला प्रत्यक्षात समोर पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला.