मराठी चित्रपट सृष्टीला नायक म्हणून आजवर अनेक देखणे चेहरे लाभले. रमेश देव, सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे, अरुण सरनाईक यांच्या यादीत रविंद्र महाजनी यांचे सुद्धा नाव आवर्जून घेतले जाते. या प्रत्येक कलाकाराने मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. रविंद्र महाजनी यांना तर मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून ओळख मिळालेली होती. मात्र ही ओळख मिळवण्यासाठी त्यांना अपार मेहनत घ्यावी लागली, काम मिळावे म्हणून अनेक निर्मात्यांचे उंबरठे सुद्धा झिजवावे लागले होते. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
रविंद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा, त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. रविंद्र महाजनी यांचे वडील नामवंत वृत्तपत्रासाठी संपादक म्हणून काम करायचे. कामानिमित्त महाजनी कुटुंब मुंबईत स्थिरावले. शाळेत असल्यापासूनच रविंद्र यांना अभिनय क्षेत्राची ओढ होती. त्यामुळे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून ते नेहमी सहभाग घ्यायचे. पण आपले शिक्षण पूर्ण करायचे हे त्यांच्या वडिलांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे बीएची पदवी मिळवण्यासाठी त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश केला. शेखर कपूर, अवतार गील, रॉबिन भट्ट या मित्रांची साथ त्यांना लाभली. या मित्रांनी हिंदी सृष्टीत स्वतःच प्रस्थ निर्माण केलं. त्यांच्याच प्रेरणेने रविंद्र महाजनी यांनी सुद्धा अभिनय क्षेत्रात जाण्याचे ठरवले. दरम्यान रविंद्र महाजनी यांच्या वडिलांचे निधन झाले.
त्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली होती. नोकरी करणे किंवा कुठेतरी काम करणे खूप गरजेचे होते. चुकीचं काम करायचं नाही या वडीलांच्या शिकवणीने त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवण्याचे ठरवले. दिवसा निर्मात्यांकडे काम मिळवण्यासाठी त्यांचे उंबरठे झिजवणे आणि रात्री टॅक्सी चालवून चार पैसे कमवणे असे ते जवळपास तीन वर्षे स्ट्रगल करत राहिले. मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. मधुसूदन कालेलकर यांनी रविंद्र महाजनी यांना एका नाटकात काम देऊ केले. जाणता अजाणता या नाटकामुळे रविंद्र महाजनी प्रसिद्धीस आले. कालेलकर यांनी त्यांच्याकडे पाहूनच तो राजहंस एक हे नाटक लिहिले. यातूनच झुंज हा चित्रपट साकारण्याची संधी त्यांना मिळाली.
झुंज चित्रपटाने रविंद्र महाजनी प्रकाशझोतात आले. अनेक निर्मात्यांनी त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावल्या. लक्ष्मी, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, हळदी कुंकू अशा चित्रपटांमधून रविंद्र महाजनी नावाचा देखणा नायक प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. यानंतर ज्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली ती पुन्हा त्यांच्याकडे भेट घेण्यासाठी आवर्जून येऊ लागली. या काळात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले मात्र तिथे तेवढे यश त्यांना मिळाले नाही. दरम्यान त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून जुलूम हा चित्रपट काढला. मात्र या क्षेत्रात त्यांना अपयश पचवावे लागले. त्यांचा मुलगा गश्मीर सध्या मराठी सृष्टीत स्थिरस्थावर झालेला पाहायला मिळतो.