रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत आता सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. इतके दिवस दीपा आणि कार्तिक यांच्यातील मतभेद आता कमी झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत जेनेलियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. श्रावणीच्या समजावण्याने कार्तिकला आपली चूक उमगते. त्यानंतर कार्तिक दीपाजवळ ही खंत व्यक्त करताना दिसला. आपण दीपाशी किती चुकीचं वागलो हे तो दिपाला पटवून देताना दिसला. याबदल्यात त्याने दिपाकडे हात जोडून माफी देखील मागितली. मात्र कार्तिक ज्या चुकांची माफी मागतोय त्या चुका पुन्हा होणार कि नाहीत याची खात्री तिला नसते.
आपल्या मुलींना तू स्विकारलस पण नवरा म्हणून तुझ्यावर कसा विश्वास ठेवू असे ती कार्तिकला विचारते. त्यावर मला सुधारण्याची एक संधी दे असे म्हणत दिपाचा विश्वास मिळवून मंदिरातच तिला पुन्हा लग्न करण्याची मागणी घालतो. एकीकडे कार्तिक आणि दिपाच्या नात्यातला दुरावा कमी होताना दिसतो आहे. मात्र दुसरीकडे आता आयेशा नवीन डाव रचताना पाहायला मिळणार आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र आलेले पाहून आयेशाचा मात्र जळफळाट होत आहे. तिचा हा नवीन डाव काय असणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. त्यासाठी मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री करण्यात आली आहे. या नवीन पात्राच्या एंट्रीने दीपा आणि कार्तिकच्या नात्यात दुरावा येणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
मालिकेत नवीन एन्ट्री घेत असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे शाल्मली तोळे. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतून तिने लावण्याची भूमिका साकारली होती. कार्तिकची बहीण आता पुन्हा एकदा मालिकेत परतलेली पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. एकतर्फी प्रेम या नाटकातून शाल्मलीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. अवघाची हा संसार ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका आहे. गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, हा खेळ सावल्यांचा, दुर्वा, स्वराज्यरक्षक संभाजी या मराठी मालिकांसोबतच तिने चुपके चुपके, श्री या हिंदी मालिका अभिनित केल्या आहेत. मैं हुं ना या हिंदी चित्रपटासोबतच एका पेक्षा एक जोडीचा मामला या रिऍलिटी शोमधून शाल्मलीने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली होती.
रंग माझा वेगळा मध्ये लावण्या आता काय रंजक खेळी करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत पुन्हा एकदा शाल्मली परतल्याने तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शाल्मली तोळे हिचे लग्न अभिनेता पियुष रानडे सोबत झाले होते. मात्र या दोघांनी काही वर्षातच घटस्फोट घेतला होता. त्यानंतर पियुषणे पुन्हा एकदा मयुरी वाघ सोबत संसार थाटला, मात्र आता हे दोघे वेगळे झाले असल्याचे बोलले जात आहे. शाल्मली मात्र पियुषसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात आपले मन रमवण्याचा प्रयत्न केला आहे.